अमरावती : अमरावती जिल्हा परीषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचा सर्व कारभार सद्यस्थितीत प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरू आहे. अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे शासनाचे विविध उपक्रम प्रभावित झाले आहेत. शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विदर्भातील शाळा सुरू होऊन एक महीना उलटला आहे. या काळात शासनाने विविध उपक्रम सुरु केले. शिक्षण सप्ताह, विदयार्थी गुणवत्ता विकास महाअभियान, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा, नवसाक्षरता असे उपक्रम राबविण्याची सूचना आहे. पण पर्यवेक्षीय यंत्रणेतील रिक्त पदांमुळे उपक्रमांचे कामकाज प्रभावित झाले आहे. शासनाने अमरावती जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. हे ही वाचा. Wardha Leopard: सावधान! वर्ध्यात बिबट, हिंगणघाटात वाघाचा वावर अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकपदी निलिमा टाके यांची नियुक्ती शासनाने केली होती. पण त्या रुजू न झाल्यामुळे त्यांचा पदभार शिवलिंग पटवे सांभाळत आहेत. पाच जिल्हाचे मुख्य पद असताना ते सुध्दा प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. अमरावती जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने सांभाळत आहेत. त्यामुळे उपशिक्षणाधिकाऱ्यांचे दोन पदे रिक्त आहेत. एका पदाचा कार्यभार भातकुली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक कोकतरे यांच्याकडे आहे. शासनाने नव्याने निर्माण केलेले योजना शिक्षणाधिकारी हे पद रिक्त झाले असून त्याचा अतिरीक्त पदभार शिक्षण विस्तार अधिकारी मानकर यांना दिला आहे. अमरावती जिल्हा परिषदेत १४ गटशिक्षणाधिकारी पदे मंजूर असून त्यापैकी ९ पदे रिक्त आहे. अतिरिक्त पदभार शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्याकडे आहे. जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ३७ पदे मंजूर असून १७ पदे कार्यरत आहे. २० पदे रिक्त आहेत. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांची २० पदे मंजूर असून ५ पदे रिक्त आहेत. या पदांचा अतिरिक्त पदभार केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्या कडे आहे. जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची १४० पदे मंजूर असून पदोन्नतीची ३१ पदे तर सरळ सेवेची ७० पदे रिक्त आहेत. तसेच पात्र मुख्याध्यापक, विषय शिक्षक, सहाय्यक शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. हे ही वाचा. विदर्भातील दोन संशोधकांना राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार अमरावती जिल्हात प्राथमिक शिक्षकांची ३०० पदे रिक्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन शिक्षकी शाळा एक शिक्षिकी झाल्या आहेत. काही शाळांमध्ये एका शिक्षकाकडे दोन ते तीन वर्ग देण्यात आले आहेत. त्यातच शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामे आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.