बुलढाणा : बिबट आणि अस्वल यांची विपुल संख्या आणि जोडीला इतर प्राणी यामुळे ज्ञानगंगा अभयारण्य वन्य जीवानी चांगलेच समृद्ध होते. २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील हे अभयारण्य चालू वर्षात सन २०२६ मध्ये एक नव्हे दोन वाघामुळे समृद्ध झाले आहे. बिबटयाच्या जोडीला वाघ, वाघीण आल्याने आणि त्यांच्या ‘पराक्रमानी’ हे अभयारण्य हजारो वन्य प्रेमी, अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी लक्षवेधी ठरले आहे.

बिबट शिकार घेऊन चढला झाडावर

दरम्यान या अभयारण्यात बिबट्याने डुकराची शिकार केल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्या किती चपळ असतो, किती वेगवान असतो आणि काहीसा खोडकर असतो याचा प्रत्यय या व्हिडीओ मधून पुन्हा नव्याने येतो.

लहान डुक्कराला पकडल्यावर तो सरासरा सागवनच्या झाडावर चढला. शिकार तोंडातून निसटते की काय शंकेने पुन्हा काही सेकंदात खाली उतरला. यानंतर त्याने खोल पांदण आणि गर्द झाडीत उडी घेत तो गायब होतॊ हे या व्हिडिओत दिसते. हा व्हिडीओ वेगाने सार्वत्रिक होत आहे.

वाघाची पुनर्स्थापना

ज्ञानगंगा अभयारण्यात राबविण्यात येत असलेल्या वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. ८ महिन्यांपूर्वी अभयारण्यात सोडण्यात आलेल्या नर वाघ “धुरंधर”ने नवीन अधिवासात पूर्णपणे जुळवून घेत आठ महिन्यांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. हे त्याचे टोपण नाव असले तरी त्याची खरी ओळख पिकेटी -1सीपी1 ही आहे.

दुसरीकडे २७ जुलै रोजी अभयारण्यात दाखल झालेली वाघीण “मोना”ही नव्या अधिवासात वेगाने रुळत असून टी 163 एसएएएफ अशी ओळख असलेली मोना ताडोबा मधील सुप्रसिद्ध कॉलर वाली चे अपत्य आहे. तिच्या हालचालींमुळे वन विभागाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.

अधिवासाचा स्वीकार

वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ सूत्रानुसार “धुरंधर” ने गेल्या आठ महिन्यांत संपूर्ण अभयारण्य आपला अधिवास म्हणून स्वीकारला आहे. तो नैसर्गिक भक्ष्यावरच अवलंबून असून नियमितपणे जंगलात भ्रमंती, शिकार आणि आपल्या क्षेत्राचे संरक्षण करत आहे. वाघाचे सर्व नैसर्गिक व्यवहार तो सातत्याने प्रदर्शित करत असल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे.या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अभयारण्यात सोडल्यानंतर आजपर्यंत “धुरंधर”ने एकाही पाळीव जनावराची शिकार केलेली नाही. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात उपलब्ध असलेले नैसर्गिक भक्ष्य आणि अधिवास वाघांसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, मानव–वन्यजीव संघर्षाची शक्यताही कमी असल्याचे वन्य विभागाचे मत आहे.

चपळ मोना!

दरम्यान, नुकतीच दाखल झालेली “मोना”ही नव्या वातावरणात सहजपणे वावरत आहे. ती जंगलातील विविध भाग, जलस्रोत आणि नैसर्गिक मार्गांचा नियमित वापर करत असून स्वतःचा अधिवास निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे. तिच्या हालचालींवरून ती ज्ञानगंगा अभयारण्याशी यशस्वीपणे जुळवून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.वन्यजीव विभागाच्या मते, “धुरंधर”चे यशस्वी पुनर्वसन आणि “मोना’₹”चे जलद अनुकूलन ही ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिर वाघसंख्या निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. भविष्यात या दोघांचे आरोग्य आणि सुरक्षितता कायम राहिल्यास अभयारण्यात नैसर्गिक प्रजननालाही चालना मिळू शकते.