नागपूर : रेल्वे स्थानकावरील पाण्यात ई. कोलाय आढळल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. दूषित पाण्यातील या जीवाणूमुळे अतिसार, उलट्या, पोटदुखीसह काही गंभीर आजार होऊ शकतात.

ई. कोलाय म्हणजे काय?

ई. कोलाय हा मानव आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा जीवाणू आहे. त्याचे बहुतांश प्रकार निरुपद्रवी असतात. मात्र, काही प्रकार संसर्गजन्य असून ते आजार निर्माण करू शकतात. दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून हा जीवाणू शरीरात गेल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. पिण्याच्या पाण्यात ई. कोलाय आढळणे हे सामान्यतः मलमूत्रजन्य दूषितपणाचे संकेत मानले जाते. त्यामुळे रेल्वे स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी पाण्याची गुणवत्ता हा महत्त्वाचा आरोग्यविषयक मुद्दा ठरतो.

अतिसार, उलट्यांचा धोका

ई. कोलायच्या संसर्गामुळे पाण्यासारखे किंवा वारंवार जुलाब होणे, पोटात कळा येणे, पोटदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसू शकतात. काही घातक प्रकारांमुळे रक्तमिश्रित जुलाब आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अशक्त व्यक्तींमध्ये संसर्गाचा परिणाम अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी पुरेसे द्रवपदार्थ आणि गरजेनुसार ओआरएस घेणे महत्त्वाचे आहे.

मूत्रमार्गालाही संसर्ग

ई. कोलायचे काही प्रकार पचनसंस्थेबरोबरच मूत्रमार्गातही संसर्ग निर्माण करू शकतात. लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे किंवा लघवी करताना त्रास अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, दूषित पाणी प्यायल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग थेट होतोच असे नाही. शरीरातील ई. कोलाय मूत्रमार्गात पोहोचल्याने हा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

गंभीर संसर्गात मूत्रपिंडाला धोका

काही विशिष्ट ई. कोलाय प्रकारांच्या गंभीर संसर्गामुळे हिमोलिटिक युरेमिक सिंड्रोम (एचयूएस) होऊ शकतो. यात लाल रक्तपेशींचे नुकसान होण्याबरोबरच मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांत मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. रक्तमिश्रित जुलाब, तीव्र अशक्तपणा किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्या मते, हगवण, अतिसार, पोटदुखी किंवा उलट्या यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे तीव्र असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कॅगच्या अहवालामुळे रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, गुणवत्ता आणि नियमित तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.