नागपूर : माटे चौक ते श्रद्धानंद चौकापर्यंतचा मुख्य रस्ता हॉटेलमालकांच्याच ताब्यात गेला आहे. परिणामी, या मार्गावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्यामुळे सामान्य नागरिकांना या मार्गावर सुरक्षित चालणेच कठीण झाले आहे.
माटे चौक ते आयटी पार्क या मार्गावर सायंकाळच्या सुमारास मोठी वर्दळ असते. या मार्गावरील उपाहारगृहांमध्ये खायला येणार ग्राहक थेट रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे अर्धा रस्ता वाहनांनी व्यापतो. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. अनेक वाहने रस्त्यात अडकल्यानंतर मोठमोठय़ाने भोंगा वाजवतात. त्याच त्रास वसाहतीतील रहिवाशांना सहन करावा लागतो. या रस्त्यावर अण्णा ईडली, फूड कोर्ट आहेत. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे पथक आणि वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही. त्यामुळे दोन्ही विभाग याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हॉटेल मालक म्हणतात, पोलिसांनी बघावे!
आमच्याकडे वेगळे वाहनतळ नाही. आम्ही ग्राहकांना बाहेर वाहन ठेवण्याची विनंती करतो. दुचाकीधारक मात्र रस्त्यावरच दुचाकी ठेवत असतील तर आम्ही काय करू शकतो? वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर दुचाकी लावणाऱ्यांवर कारवाई करावी.-अभिषेक जाचक, व्यवस्थापक, अण्णा ईडली.
आमच्याकडे तीन सुरक्षारक्षक असून त्यांना वाहन ठेवण्याच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आली आहे. आमच्याकडे कार आणि दुचाकींसाठी वेगळी व्यवस्था आहे. पण तरीही कुणी ग्राहक रस्त्यावर वाहन ठेवत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे.

संजय श्रोत्री, सल्लागार व्यवस्थापक, फुड कोर्ट.
प्रत्येक हॉटेल किंवा आस्थापनांनी आपल्या ग्राहकांना रस्त्यावर वाहने ठेवू देऊ नये. सुरक्षारक्षक नेमून ग्राहकांसाठी वाहनताळाची व्यवस्था करावी. अन्यथा, वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतील. – प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.