अकोला : रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. मात्र, वाशीमच्या केकत उमरा येथील चेतन सेवांकूर आश्रमातील दृष्टिहीन कलाकारांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या पर्यावरणपूरक राख्या यंदा विशेष आकर्षण ठरत आहेत. रानफुलांच्या पाकळ्या, कडधान्ये आणि टाकाऊ वस्तूंचा कल्पक वापर करून राख्यांची अत्यंत आकर्षक पद्धतीने निर्मिती करण्यात आली. स्वावलंबनासाठी दिव्यांग कलावंतांनी सुरू केलेला हा उपक्रम प्रेरणादायी व आदर्श ठरत आहे.

राख्यांना नैसर्गिक आणि आकर्षक रूप; फुलांच्या पाकळ्यांचा वापर

श्रावणात बहरणाऱ्या रानझेंडू, तेरडा, कास, चाफा आणि शेवंती यासारख्या विविध फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून राख्यांना नैसर्गिक आणि आकर्षक रूप देण्यात आले आहे. यासोबतच कागद, धागे तसेच विविध टाकाऊ वस्तूंपासून फॅन्सी आणि कलाकुसरीच्या राख्याही तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या राख्या आकर्षक असण्यासोबतच पर्यावरणपूरकही ठरत आहेत.

‘सेवांकूर’चा आदर्श उपक्रम

केकत उमरा येथील चेतन सेवांकूर आश्रमात डझनभर मुलांचे वास्तव्य आहे. येथील दृष्टिहीन कलाकार विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गीतगायन करून उदरनिर्वाह करतात. मात्र, पावसाळ्यात संगीताचे कार्यक्रम कमी होत असल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन यंदा स्थानिक महिला बचत गटाच्या सहकार्याने दृष्टिहीन कलाकारांनी पर्यावरणपूरक राखी निर्मितीचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

कल्पकता आणि कलागुणांना वाव

आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देत या कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर राख्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या राख्यांच्या विक्रीसाठी चेतन सेवांकूरच्या प्रांगणात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. स्थानिक महिला आणि नागरिकांकडून या राख्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांकडून राख्यांची खरेदीही केली जात आहे.

राख्यांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासोबतच दृष्टिहीन कलाकारांना त्यांच्या कलागुणांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली आहे. दिव्यांग व्यक्तींमध्येही कला, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वावलंबी होण्याची क्षमता आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. चेतन सेवांकूरचे कार्यवाहक पांडुरंग उचितकर, चेतन उचितकर, धीरज चोरपगार, कोमल खांडेकर, अश्विनी पवार तसेच अन्य कलाकारांनी या उपक्रमात सहभाग घेतला. स्थानिक बचत गटातील माधुरी नेतन्सकर यांच्यासह अन्य महिलांनीही उपक्रमाला सहकार्य करत राख्यांची खरेदी केली.