नागपूर: अंमलबजावणी संचालनालयाच्या नागपूर कार्यालयाने ‘प्रयाग डेव्हलपर्स अँड बिल्डर्स’चे मालक, बिल्डर शशांक गोविंदप्रसाद पांडे यांच्याशी संबंधित नागपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांवर छापे टाकले. गेल्या चार दिवयांपासून सुरू असलेल्या या तपासणीत ईडीला दोन कोटींची रोख रक्कम सापडली आहे.
‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’ (PMLA), अंतर्गत ईडीच्या पथकाने २६ ऑक्टोबर पासून ही कारवाई सुरू केली होती.
काय सापडले
पांडे यांच्या प्रतिष्ठानांवर टाकलेल्या छाप्यात ईडीने अनेक आक्षेपार्ह दस्तऐवज, नोंदी आणि डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत. याव्यतिरिक्त, ४० लाख रुपयांहून अधिक रकमेची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तपासादरम्यान कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ताही समोर आली असून, ती गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचा संशय आहे.
विधवा महिलेची साडे नऊ कोटींची फसवणूक
अंमलबजावणी संचालनालयाच्या प्राथमिक तपासानुसार, शशांक पांडे यांनी एका ज्येष्ठ विधवा महिलेची मालकी असलेल्या जमिनीच्या विकासासाठी करार केला होता. त्यानुसार या महिलेला पावणे दोन कोटी रुपये आणि १४ निवासी सदनिका देण्याचे आश्वासन दिले होते.
करार एनवेळी केला रद्द
करारानुसार विकासक पांडे यांनी महिलेसाठी निश्चित सदनिका महिलेच्या संमतीशिवाय रद्द केल्या. नंतर सदनिका इतरांना परस्पर विकल्या. यातून मिळालेले तब्बल ९ कोटी रुपये वैयक्तिक वापरासाठी वळवत त्याचा गैरवापर केला. याशिवाय, ४५ लाख रुपयांची रक्कमही दिली गेली नाही. त्यामुळे आपले ९.४ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.
संमतीविना विकल्या गहाण सदनिका
‘दिव्या प्रयाग अपार्टमेंट’ प्रकल्पातील अनियमितता तपासताना ईडीला गहाण ठेवलेल्या २२ सदनिका पांडे यांनी संमतीविना विकल्याचे उघडकीस आले. या २२ सदनिका’देवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ कडे २२ कोटी रुपयांच्या कर्ज मिळवण्यासाठी गहाण ठेवण्यात आले होते, ज्यापैकी ११ कोटी रुपयांचे कर्ज वितरितही करण्यात आले होते.
दोन एफआयआरच्या आधारे चौकशी
पांडे यांनी बँकेकडून आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेता आणि मालमत्ता गहाण असल्याची माहिती खरेदीदारांना न देता या सदनिका विकल्या. याव्यतिरिक्त, गृहकर्जाच्या संदर्भात बँकेकडे एक कथित खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले, ज्यामध्ये मालमत्ता आधीच गहाण असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर, १२.८४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आणि ‘सरफेसी’ कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. नागपूरमधील अजनी आणि राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यांत एफआयआर नोंदवल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने हा तपास सुरू केला आहे.
