अकोला : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम स्थानिक व्यवसायावर झाला. खाद्यतेलाच्या भावाचाही भडका उडाला आहे. तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे.

युद्धाचे जीवनावश्यक वस्तूंवर गंभीर परिणाम

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली. इंधन, गॅससह जीवनावश्यक वस्तूंवर त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत. देशात ६५ टक्के खाद्यतेल आयात केले जाते. सध्या युद्धामुळे अपेक्षित प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेलाची दरवाढ झाली.

तेलाच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ

तेलाच्या दरात किलो आणि लिटरमागे १० ते २० रुपये वाढ झाली आहे. वाढलेल्या दराने तेलाची विक्री केली जात आहे. खाद्यतेलाच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमटले. जिल्ह्यात काही किरकोळ विक्रेत्यांनी युद्धाचे कारण पुढे देऊन खाद्यतेलाची भाववाढ केली. खाद्यतेलाचे भाव अचानक वाढल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने वाढलेल्या भावाकडे लक्ष देऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.

दर नियंत्रित दाखविण्यासाठी कमी वजनाचे पाकीट

शेंगदाणा, सोयाबीन, राईस आदींसह विविध प्रकारच्या तेलांची पाकिटांमधून मोठ्या प्रमाणात विक्री होते. साधारणपणे एक लिटर तेलाचे पाकीट असते. मात्र, भाव वाढीनंतर दर नियंत्रणात असल्याचे दाखविण्यासाठी तेलाच्या पाकिटांची किंमत न वाढवता त्याचे वजन घटविण्यात आले आहेत. बहुतांश कंपन्यांनी खाद्यतेलाचे एक लिटरचे पाकीट आता ७०० किंवा ८०० एमएलचे केले. ग्राहकांना दरवाढीची जाणीव होऊ नये यासाठी कंपन्यांनी हा प्रयोग केला.

शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी

खाद्यतेलाच्या भावाचा मोठा भडका उडाला. मात्र, त्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. सोयाबीन तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सोयाबीन तेलाचे भाव वाढले, मात्र सोयाबीनच्या भावात कुठलीही भाववाढ नोंदवल्या गेली नाही. सध्या सोयाबीनचा दर चार हजार ८०० ते पाच हजार ५०० रुपये दरम्यान आहे. उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना या भावात सोयाबीन विक्री नुकसानीचे ठरते. एकीकडे युद्धाचे कारणपुढे करून खाद्यतेलाच्या भावात मोठी वाढ करण्यात आली. दुसरीकडे याच युद्धाच्या कारणामुळे निर्यात होत नसल्याने शेतमालाचे भाव पाडल्या जात आहेत. शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.