education well educated in couples of divorce quantity Mother in law intervenes Nagpur news ysh 95 | Loksatta

नागपूर: तुमच्याही संसारात सासू हस्तक्षेप करते का? मग, वाचाच…

संसारात सासूची वाढती ढवळाढवळ हे घटस्फोटाचे प्रमुख कारण असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समुपदेशकांनी काढला आहे.

नागपूर: तुमच्याही संसारात सासू हस्तक्षेप करते का? मग, वाचाच…
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

नागपूर: शिक्षणामुळे माणूस समजूतदार होतो हे खरे असले तरी हल्लीच्या सुशिक्षित दाम्पत्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी संसारात सासूची वाढती ढवळाढवळ हे प्रमुख कारण असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समुपदेशकांनी काढला आहे. कौटुंबिक न्यायालयामध्ये आणि भरोसा सेलमध्ये येणाऱ्या बहुतांश दाम्पत्यांच्या याच तक्रारी असल्याचे दिसून आले आहे.

मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दाम्पत्य यासाठी का प्रवृत्त होतात, असा प्रश्न उद्भवत आहे. समुपदेशकांकडे येणारे बुहतांश नवनिवाहित मुले व मुलींचे सासूसोबतचे संबंध विकोपाला गेले असल्याचे सांगतात. सासूला सुनेतील दोष वा सुनेला सासूची संसारातील वाढती ढवळाढवळ मान्य नसते. यामुळे अनेकदा खटके उडतात. त्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होतो. याची परिणिती घटस्फोटासाठी अर्ज करण्यात होत असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी जिल्हा न्यायालय व शहर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मार्फत संबंधितांचे समुपदेशन केले जाते.

हेही वाचा >>> नागपूर: कारागृह पोलिसांचा ‘साइड बिझनेस’; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर १०० रुपये प्रतिमिनिट कॉलसाठी…

या माध्यमातून नात्यातील दुरावा कमी करीत, समेट घडवून आणण्याचे काम करण्यात येते. मागीलवर्षी सेलकडे २ हजार ५० प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यामध्ये ७९४ दाम्पत्यांचे समेट घडवून आणण्यात आले. १५३ प्रकरणे पोलिसांकडे पाठवण्यात आली. गेल्या ८ महिन्यात १ हजार ९७१ प्रकरणे नोंदवण्यात आली. यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये दाम्पत्यांच्या संसारात मुलाच्या वा मुलीच्या आईने केलेली ढवळाढवळ हेच मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांशी मुलगा वा मुलगी विभक्त होण्याच्या विचार करताना दिसून येतात, असे समुपदेशकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> नागपूर: सकारात्मक, विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेने घेतले निलगाईला दत्तक

सुशिक्षित दाम्पत्यांचे प्रमाण अधिक

घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित दाम्पत्यांचे प्रमाण अधिक आहे. भरोसा सेलमार्फत समुपदेशन करताना सुशिक्षित दाम्पत्यांचा आडमुठेपणा बऱ्याच प्रमाणात आडवा येतो. त्यामुळे बरीच प्रकरणे काडीमोडपर्यंत जाताना दिसून येतात. याउलट अशिक्षितांमध्ये याचे प्रमाण केवळ १५ टक्के असून त्यातही समेट होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 10:19 IST
Next Story
नागपूर: सकारात्मक, विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेने घेतले निलगाईला दत्तक