नागपूर : मिहानमध्ये विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) व्यवसाय सुरू करण्यासाठी दिलेल्या भूखंडांपैकी आठ भूखंड संबंधित कंपन्यांनी व्यवसाय सुरू न केल्याने रद्द करण्यात आले आहे. मिहान सेझमध्ये आजपर्यंत केवळ २४ तर गैरसेझमधील २८ प्रकल्पच सुरू झाले आहे, असे माहिती अधिकारातून प्राप्त तपशिलातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने मिहानमध्ये जागा शिल्लक नसल्याचा दावा होतो. या आकडेवारीवरून या दाव्यावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिहानमधील वास्तव्याबाबत आपण जाणून घेऊ या.
राज्यातील महत्वाच्या सेझ प्रकल्पापैकी एक म्हणून मिहानची ख्याती आहे. विदर्भातील सर्वात महत्वाच्या प्रकल्प म्हणून मिहानला बघितले जात होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एम.ए.डी. सी.) माहितीनुसार, मिहान सेझ परिसरात एकूण ७८ वेगवेगळ्या कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात आले आहे. गैरसेझ क्षेत्रात एम्स रुग्णालयासह इतर एकूण ५२ संस्थांना जागा देण्यात आली. त्यापैकी सेझमध्ये ७८ पैकी केवळ २४ कंपन्यांचे काम सुरू झाले तर ४ कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे.
१९ कंपन्यांना नव्याने जागा देण्यात आली. ३१ कंपन्या लवकरच सुरू होणार असल्याचा एमएडीसीचा दावा आहे. तर गैरसेझमधील २८ संस्थांचे काम सुरू झाले आहे. तीन कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. ११ कंपन्यांना नव्याने जागा आवंटित केली गेली, तर १० कंपन्यांचे काम लवकरच सुरू होण्याचा दावा एमएडीसीने केला आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना यासंदर्भात प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते. त्यामुळे मिहान प्रकल्पाच्या विकासाबाबत सत्ताधारी पक्षाकडून होणाऱ्या दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिहान प्रकल्पातून १.१६ लाख जणांना रोजगाराचा दावा…
मिहान-सेझमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ७८ हजार ७७१ आणि सेझबाहेरील क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ३७ हजार ६६४ अशा एकूण १ लाख १६ हजार ४३५ जणांना रोजगार मिळाला, असा दावा एमएडीसीकडून करण्यात आला. यात विदर्भातील किती व त्याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचेही एमएडीसीकडून कळवण्यात आले.
सेझमधील १२ कंपन्यांकडे ३२ कोटी रुपयांची थकबाकी
मिहानमधील सेझ परिसरातील १२ कंपन्यांकडून एमएडीसीला ३२ कोटी आणि सेझबाहेरील परिसरातून १ कंपनीकडून २९.२१ लाख रुपये मिळणे शिल्लक असल्याचेही माहिती अधिकारातून कोलरकर यांनी पुढे आणले.
