Eknath Shinde Chartered Flight Controversy: नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात इंधन बचत आणि काटकसरीचा संदेश देत शासकीय पातळीवर खर्चात कपात करण्याचे आवाहन केले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या मोहिमेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी त्यांनी मुंबई-नागपूर प्रवास चार्टर्ड विमानाने केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा ‘बुलेट’ संदेश, शिंदेंचा वेगळा मार्ग
राज्यातील सरकारकडून इंधन बचतीचा प्रचार जोरात सुरू असताना मुख्यमंत्री स्वतः ‘बुलेट’वरून प्रवास करून जनतेला संदेश देत आहेत. वर्षा निवासस्थान ते मंत्रालय असा प्रवास करत त्यांनी काटकसरीचे प्रतीकात्मक प्रदर्शन केले होते. मात्र, त्याच सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी विमानवारीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागपूर दौऱ्यासाठी चार्टर्ड विमानाचा वापर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी नागपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात कोणतीही महत्त्वाची शासकीय बैठक किंवा आपत्कालीन कार्यक्रम नव्हता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी ते मुंबईहून खासगी चार्टर्ड विमानाने नागपूरला आले आणि कार्यक्रमानंतर पुन्हा त्याच विमानाने परतले.
इंधन बचतीच्या आवाहनाशी विसंगत वर्तन?
केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने इंधन बचतीचा संदेश दिला जात असताना, व्हीआयपी प्रवासासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या या घटनेवरून राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत असताना लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची उधळपट्टी टाळायला हवी होती, अशी चर्चा सुरू आहे.
विरोधकांकडून टीकेची शक्यता वाढली
या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा साधेपणा दाखवला जात असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांचा लक्झरी प्रवास ‘दुहेरी भूमिका’ दर्शवतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील सध्याच्या इंधन बचत मोहिमेला या घटनेमुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
