Akola Shiv Sena Executive Committee Dissolved : अकोला : शिवसेना शिंदे गटात मोठी उलथापालथ झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन संपूर्ण अकोला जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्हा कार्यकारिणीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंतर्गत गटबाजी, एकमेकांची उणीदुणी काढणे, पक्षांतर्गत असमन्वय, विस्कळीत व मनमानी कारभार स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलाच भोवला आहे.

पाच विधानसभा मतदारसंघाच्या जिल्ह्यात होते चार जिल्हाप्रमुख

अकोला जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटात काही आलबेल नसल्याचे चित्र सुरुवातीपासूनच आहे. गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले. अंतर्गत वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांना पद देण्याची प्रथाच शिंदे गटात पडली होती. पाच विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने तब्बल चार जिल्हा प्रमुख नेमले होते.

त्यांच्या नियुक्ती पत्रात विशिष्ट विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असल्याचा उल्लेख केला. त्यावर हे जिल्हा प्रमुख की विधानसभा प्रमुख? अशी कुजबुज पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये कायम राहिली. नियुक्त्यांमुळे जुन्या व नव्यांमध्ये वाद निर्माण झाला. अंतर्गत गटबाजीतूनच जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचाच प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध देखील केला होता. या प्रकरणामुळे पक्षाची अब्रू वेशीवर टांगल्या गेली.

निवडणुकांमध्ये मोठे अपयश

वेगवेगळ्या गटाकडून झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा संपर्क प्रमुख बदलल्या गेले. लोकसभा संपर्क प्रमुख देखील नियुक्त केल्या गेले. संपर्क प्रमुखांच्या दौऱ्यात देखील कायम गटबाजीचे दर्शन झाले. चार जिल्हा प्रमुखांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या होत्या. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये वितुष्ट असल्याने त्यांच्यातून विस्तव ही जात नव्हता. समन्वयाचा प्रचंड अभाव आहेच.

या सर्व प्रकारामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा व त्यानंतर नगर पालिका आणि महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. मोठी रसद पुरवून देखील पक्षाचा घसरलेला आलेख नेतृत्वापुढे मोठ्या चिंतनाचा विषय ठरला. या संदर्भात काही वरिष्ठांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेऊन तक्रारी केल्या होत्या.

संघटनात्मक विस्तार नाहीच

जिल्हा कार्यकारिणी व्यापक करून देखील पक्षाचा संघटनात्मक विस्तार झालेला नाही. निवडणुकांमधील अपयश, सातत्यपूर्ण गटबाजी, पक्षांतर्गत कुरबुरी, अंतर्गत कलहामुळे अखेर एकनाथ शिंदे यांनी जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी या संदर्भात गुरुवारी प्रसिद्धी पत्रक काढले. या आदेशानुसार जिल्ह्यासह विविध आघाड्या बरखास्त झाल्या आहेत.