नागपूर : दुकानांच्या लिलावाबाबत चिखलदऱ्याच्या आमदाराने तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवले होते. या पत्राच्या आधारावर तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री शिंदे यांनी काहीही कारण न देता  लिलावावर बंदी आणली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वणीमधील दुकानांच्या लिलाव प्रकरणात नगरविकास मंत्र्यांवर मौखिक ताशेरे ओढले होते. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात चार आठवड्यात याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यावर अद्याप निर्णय न घेणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले होते आणि शुक्रवारपर्यंत नगरविकास विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण न आल्यास न्यायालय योग्य आदेश देईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली होती. न्यायालयाने फटकारल्यानंर  नगरविकास मंत्री यांनी शुक्रवारी त्यांच्या निर्णयाची माहिती न्यायालयात सादर केली,

अधिकारक्षेत्रात नसताना निर्णय

वणीमधील बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या १६० दुकानांना रिकामे करून त्यांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने पांडुरंग टोंगे यांच्याकडून दाखल याचिका निकाली काढत दिले होते.  २०१९ साली राज्यमंत्र्यांनी सुनावणी घेत नगरपालिकेला संबंधित दुकाने तात्काळ रिकामी करून ई-टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून लिलाव करण्याचे आदेश दिले. तत्कालीन राज्यमंत्र्यांच्या या आदेशाला गांधी चौक गोलधारक  दुकानदारांच्या संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रिया पुढे न राबवण्याचे आदेश दिले. यानंतर संघटनेच्यावतीने याचिका परत घेण्यात आली. १५ मार्च २०२४ रोजी या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना लिलाव प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी कुठलेही स्पष्ट कारण न देता लिलाव प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. राज्यशासनाकडे फेरविचार याचिका प्रलंबित असताना व मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

जानेवारीत सुनावणी, फटकारल्यावर निर्णय

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर २० डिसेंबर २०२४ रोजी एका महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. नगरविकास विभागाच्या मंत्र्यांनी याबाबत २१ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी घेतली, मात्र निर्णय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर सुनावणी घेऊनही निर्णय न घेणे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. नगरविकास विभागाने याप्रकरणात गाळेधारकांचे अपील फेटाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे शुक्रवारी न्यायालयाला सांगितले.