नागपूर : अल निनोमुळे यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकांवर त्याचा परिणाम झाला. शेतकऱ्यांसोबत इतरही व्यवसायाला त्याचा फटका बसत असल्याचे दिसते आहे. शेतात पीक नसल्याने रोजगारांच्या हाताला यंदा कमी आहे. त्यामुळे त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न अधिकच बकट होणार असल्याचे संकेत आहेत. कमी पावसामुळे तलावांमधील खालावलेल्या पाणीपातळीमुळे नागपूर विभागातील मत्स्य व्यवसाय संकटात सापडला आहे. यंदा मत्स्य उत्पादनात तब्बल ८० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज असून, याचा फटका विभागातील सुमारे ६० हजार मच्छीमारांना बसण्याची शक्यता आहे. मासेमारीवर वर्षभर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांसमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हजारो रुपयांचे मत्स्यबीज गेले वाया

नागपूर विभागात गोसेखुर्द प्रकल्प वगळता ७५ तलावांमध्ये ६०० मच्छीमार सहकारी संस्थांच्या माध्यमातून मासेमारी केली जाते. प्रत्येक संस्थेशी किमान १०० मच्छीमार जोडलेले आहेत. नियमानुसार जून-जुलै महिन्यात तलावांमध्ये मत्स्यबीज सोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे मच्छीमारांनी ठेका कायम ठेवण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च करून तलावांमध्ये मत्स्यबीज सोडले. मात्र, पाणीसाठा कमी झाल्याने माशांची अपेक्षित वाढ झाली नाही. सध्या तलावांमध्ये केवळ ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. साधारणतः मार्च महिन्यापर्यंत मासे विक्रीसाठी तयार होतात. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांच्या वार्षिक उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मत्स्यबीज खरेदी आणि संवर्धनासाठी केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे.

अतिवृष्टीची नुकसानभरपाईही रखडली

२०२५ मधील अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्यभरातून ९० कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. त्यात नागपूर जिल्ह्याच्या ८५ लाख रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश होता. मात्र, अद्याप मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची अंमलबजावणीही प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

हेक्टरी १० हजारांची मदत द्या

शेतकऱ्यांप्रमाणे मत्स्य उत्पादकांनाही शासनाने हेक्टरी १० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी केली आहे. शासनाने तातडीने मदतीचा निर्णय न घेतल्यास हजारो मच्छीमार कुटुंबांचे आर्थिक संकट अधिक गडद होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.