वर्धा : वैद्यकीय शिक्षणात देहाचा अंतर्बाह्य अभ्यास केल्या जातो. त्यासाठी आवश्यक मृतदेह प्राप्त करण्यासाठी बरेच सायास करावे लागत असल्याची वैद्यकीय महाविद्यालयांची तक्रार राहते. या पार्श्वभूमीवर स्वतः मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करण्याची बाब अभिनंदनीय ठरावी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देहदान अवयवदान उपक्रम हाती घेतला आहे. त्याची शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात देण्याचे काम संघटनेचे सदस्य असलेले सिनेट सदस्य डॉ.सुशील मेश्राम यांनी दोन पुस्तके लिहून केले आहे. अवयवदान करण्याबाबत समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे समितीचे प्रयत्न एका जोडप्याला भारावून गेले.जिल्हा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष विजय पटवर्धन व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई यांनी समितीचे गजेंद्र सूरकार यांना त्यांच्या श्रीनिवास कॉलनीतील घरी बोलावून मरणोत्तर देहदानाचे संकल्प पत्र भरून घेतले.नव्वद वर्षीय विजयराव हे यावेळी म्हणाले की आपल्या शरीरातील अवयव गरजूंना मिळतील व त्यामुळे मरणा नंतरही अवयव रुपात जिवंत राहण्याचा आत्मानंद मिळेल.आमच्या दोघांच्या देहाचा मरणोत्तर उपयोग शिकावू डॉक्टरांना मिळण्याची बाब समाधान देणारी ठरावी.या कृतीतून समाजास प्रेरणा मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तसेच समितीच्या या प्रबोधनात्मक कार्यास सहकार्य म्हणून पटवर्धन यांनी निवृत्ती वेतनातील अकरा हजार रुपये समितीचे तेजस खडसे व वैभव सूरकार यांच्या सुपूर्द केले.