नागपूर : शुक्रवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे सत्तर वर्षीय वृध्द महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गिटटीखदान हददीतील महेशनगर येथे घडली. मीरा कप्पूस्वामी (७०, रा. महेशनगर, प्लॉट नं. ९८ , गिट्टीखदान ), असे घरात शिरलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी मिरा कप्पूस्वामी यांच्या घरात शिरले. त्यावेळी त्या आजारी असल्यामुळे घरी झोपलेल्या होत्या.
त्यांना पावसाचे पाणी घरी शिरत असल्याचे माहिती नव्हते. घरात शिरलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्या घरातील शिरलेल्या पाण्यावर तरंताना दिसून आल्या. त्यांना पोलिसांनी उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी दिलीप जियालाल कनोजिया (६३ ) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.