नागपूर : गृहमंत्र्यांचे शहरात महिला व मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. शहराचे हृदयस्थळ असलेल्या झीरो माईल चौकात एका वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. त्या महिलेचा मृतदेह अगदी झीरोमाईल स्तंभाशेजारीच आढळल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. अद्याप महिलेची ओळख पटली नसून या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ५५ ते ५८ वर्षे वयोगटातील एक महिला बेसहारा आहे. ती सोमवारी रात्री झीरो माईल स्तंभ चौकात फिरत होती. पावसाने भीजल्यामुळे ती महिला झीरो माईलस्तंभाजळच एका झाडाखाली बसली होती. सोमवारी रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ती महिला रस्त्याच्या कडेला बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिला प्यायला पाणी दिले आणि निघून गेले.
मध्यरात्रीनंतर ती महिला झाडाखाली झोपली असता दारु किंवा अंमली पदार्थाच्या नशेत आलेल्या आरोपीने त्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला असावा. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता तिचे डोके फरशीचा तुकड्याने ठेचून खून केला असावा. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मंगळवारी सकाळी एका नागरिकाला रक्ताने माखलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. काही वेळानंतर सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी प्राथमिक माहितीवरुन सीताबर्डी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच नाही
देशाचे केंद्रबिंदू असलेल्या झीरोमाईल चौकात सीसीटीव्ही नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद न झाल्यामुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे झाले आहे. मात्र,संविधान चौक आणि मॉरेस कॉलेट टी पॉईंट चौकातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून काही धागा मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेत हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. – विठ्ठलसिंह राजपूत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीताबर्डी पोलीस ठाणे, नागपूर)