महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोटय़वधी खर्च केलेल्या सोनेगाव तलावाचे नव्याने पुनरुज्जीवन

नागपूर : भोसल्यांची  ऐतिहासिक निर्मिती असलेल्या सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे आठ वर्षांपूर्वी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले होते. त्या कामाचा फलक तलावाच्या काठावर आजही दिमाखात झळकत आहे. असे असताना आता पुन्हा त्याच सौंदर्यीकरणाचा प्रचार केला जात आहे. राज्य सरकार आणि महापालिकेकडून उपराजधानीतील तलावांच्या सौंदर्यीकरणाचा घातला जाणारा घाट हा खरोखरच सौंदर्यीकरणासाठी आहे की महापालिका निवडणुकांसाठी, असा प्रश्न आता नागरिकच विचारायला लागले आहेत.

राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सात-आठ वर्षांपूर्वी सोनेगाव तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. २० हेक्टरमध्ये पसरलेल्या या तलावाच्या पुनरुज्जीवनाकरिता राज्य शासन आणि महापालिके ने हातभार लावला. त्यासाठी तीन कोटी २४ लाख ८३ हजार ७३८ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. त्यात पुन्हा भर घालण्यात आली आणि चार कोटी सात लाख २५ हजार ४१८ रुपये इतका सुधारित निधी देण्यात आला. त्यात शासकीय अनुदान दोन कोटी २७ लाख ३८ हजार ६३० रुपये आणि महापालिके ने एक कोटी ७९ लाख ८६ हजार ७८८ रुपयांची भर घातली. कोटय़ावधी रुपये त्या काळात तलावाच्या पुनरुज्जीवनावर खर्च करण्यात आल्यानंतरही आता पुन्हा तलावाच्या सौंदर्यीकरणाची गरज का पडली, हे कळायला मार्ग नाही. भोसल्यांच्या कार्यकाळातील हा विस्तीर्ण असा तलाव आता अर्धाच राहिला आहे. तलावाच्या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने या बांधकामामुळे तलावाचे नैसर्गिक पाण्याचे झरे बंद झाले आणि इमारतीतील मलवाहिन्या  तलावात सोडण्यात आल्याने तलावातील पाणीही खराब झाले. नैसर्गिक झरे बंद झाल्यामुळे पाण्याची क्षमता कमी झाली. तलाव पूर्णपणे अतिक्र मणाने वेढल्यामुळे तलावाच्या सौंदर्यीकरणाला जागाच उरली नाही. तीन-चार वर्षांपूर्वी माजी महापौर संदीप जोशी यांनी तलावाच्या खोलीकरणाचा घाट घातला. त्यातून निघालेली माती सहकारनगर स्मशानघाटाजवळ टाकण्यात आली आणि अवघ्या दोन दिवसात तिथून ती गायब झाली. तलावातून माती काढल्यानंतर त्याठिकाणी सिमेंटसारखी पांढरी माती टाकण्यात आली आणि पांढरे दगड लागल्याचे सांगून तलावाचे खोलीकरण बंद करण्यात आले. आता गेल्या दोन-चार वर्षांपासून तलावात उन्हाळ्यात देखील पाणी राहात आहे, पण हा तलावाच्या खोलीकरणाचा परिणाम नसून लगतच्या इमारतीतून सोडल्या जाणाऱ्या मलवाहिन्यांचे पाणी तलावात जात आहे. मात्र, आता पुन्हा महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तलाव सौंदर्यीकरणाचा  घाट नव्याने घातला जात आहे.

 

श्रेयवादासाठी गर्दी का जमवताय?

या तलावाच्या सौंदर्यीकरणावर गेल्या दशकात दहा कोटीपेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला. त्यासाठी जनतेचे पैसे वापरण्यात आले. आता पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला जात आहे. जनतेचा पैसा चांगल्या पद्धतीनेच खर्च व्हायला हवा. देशात करोनाची स्थिती असताना के वळ श्रेयवादासाठी वारंवार सौंदर्यीकरणाचा घाट घालून गर्दी जमवण्याचे काहीही कारण नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सहकारनगर येथील रहिवासी श्री. इंगळे यांनी व्यक्त केली.