वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR)-२०२६ अंतर्गत कामात हलगर्जीपणा आणि कुचराई करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (BLO) आता थेट फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गोवडा (भा.प्र.से.) यांनी तसा आदेशच दिल्याने शिक्षक संतप्त झाले आहे.या संदर्भातील कारवाईसाठी आवश्यक पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना जाहीर पत्र पाठवले आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी देणे, Enumeration Form (EF) चे वाटप करणे, फॉर्म संकलन करणे आणि त्यांचे डिजिटायझेशन (Digitisation) करणे ही कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक होते.
कामात हलगर्जीपणा ?
परंतु, काही बीएलओ (BLO) यांनी त्यांना सोपवलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या कामात कमालीचा हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. अनेकांनी अजूनही ‘ईएफ’ वितरण आणि डिजिटायझेशनचे काम सुरूच केले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. प्रत्येक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याला १० पोलीस कर्मचारी मिळणार आहेत.
कामात चुकल्यास अधिकाऱ्यांना नोटीस बजावणे, पंचनामा करणे, आवश्यक पुरावे गोळा करणे आणि गरज पडल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्यामार्फत थेट प्रथम माहिती अहवाल (FIR) म्हणजेच गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
कडक कायदेशीर कारवाईचा इशारा
नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी हे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने काम करतील. नोटीस बजावताना किंवा पंचनामा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच तातडीने एफआयआर (FIR) दाखल करता यावा, यासाठी हे पोलीस मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि कालबद्ध असल्याने, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट संकेत या पत्राद्वारे देण्यात आला आहे. या पत्राच्या प्रती मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) आणि विभागीय आयुक्त (छत्रपती संभाजीनगर) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कामाचा तणाव आणि आली भोवळ
हे काम जोखमीचे असून यात सवलत देण्याची मागणी शिक्षक संघटना सातत्याने करीत आहे. त्याचे एक उदाहरणच पुढे आले आहे. वाळूज गंगापूर येथील SIR चे काम करणारे BLO ढगे सर यांना काम करीत असतांना भोवळ आली. तेव्हा तो हार्ट अटॅक असल्याचे निष्पन्न झाले. त्वरित रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याने ते आता स्थिर आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक संघटनेचे प्रदेश नेते सतीश जगताप यांनी दिली. संभाजीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश तर शिक्षकी पेशाची मानहानी करणारा आहे. कुणी या कामावर नं आल्यास त्यांना पकडून आणण्याचे आदेश संताप निर्माण करीत आहे. या बाबीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घेतली पाहिजे, असे जगताप स्पष्ट करतात.
