यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उबाठाचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी दाखल करताना निवडणूक आयोगास शपथपत्रात खोटी माहिती सादर केली, असा आरोप येथील राजेश विजय भगत यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

संजय देशमुख यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी करणारी निवडणूक रिट याचिका (क्र.डब्युारपीएसटी/८०२९/२०२४) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्याचे भगत यांनी यावेळी सांगितले. उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी निवडणूक आयोगास खोटे शपथपत्र सादर करून त्यात त्यांच्यावर पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक दिग्रस शाखेचे कर्ज आहे. या कर्जाचा बोजा सातबारावर नोंद असताना त्यांनी उमेदवारी दाखल करताना शपथपत्रात तो नमूद केला नाही, असा आरोप भगत यांनी केला.

हेही वाचा…संजय राऊत म्हणतात, ‘ती नाची, डान्‍सर, बबली….’

देशमुख यांनी निवडणूक आयोगास खोटे शपथपत्र सादर करून भारत सरकार निवडणूक आयोगाची व यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील मतदारांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे संजय देशमुख यांची उमदेवारी रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारा न्यायालयाकडे करण्यात आली आहे, असे राजेश भगत म्हणाले. या याचिकेवर न्यायालयात अद्याप सुनावणी झाली नव्हती. यासंदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.