अकोला: चेकने बिल पेमेंट करताय? तर वेळीच सावध होऊन या चुका टाळायला हव्या. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो. थकीत वीज बिलासाठी महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वटविले न जाणारे धनादेश देत महावितरणची दिशाभूल केली जात आहे. वेळ मारून नेणाऱ्या या वीज ग्राहकांवर आता थेट गुन्हा दाखल केला जात आहे. या मोहिमेला अकोला परिमंडळात वेग दिला आहे. धनादेश देतांनाच तो योग्यरित्या भरून न दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिला.

महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी विजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अकोला परिमंडळात दरमहा सरासरी २०० धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. याचे धक्कादायक प्रकार समोर आले. काही वीज ग्राहकांनी दिलेल्या धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादर होत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी, वीज बिलाची वसूली न होता थकबाकीत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणने मोहिम घेत धनादेश अनादर झालेल्या वीज ग्राहकांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या दृष्टिने हालचालींना गती दिली आहे.

जीएसटी करासह ८८५ रुपयांचा प्रत्येक बिलासाठी दंड

या अगोदर चेक बाऊंस झाल्यास वीज ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५/- रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येते. तसेच अनादरीत झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी स्वतंत्र दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येते.

कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

महावितरणने आता दिशाभूल करणाऱ्या वीज ग्राहकांविरोधात कायदेशीर कारवाईची मोहिम हाती घेतली असून, या ग्राहकांविरूध्द निगोशिएबल इंन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी धनादेश देतांना ते योग्यरित्या भरले आहे याची खात्री करावी. तसेच आवश्यक रक्कम खात्यात जमा असल्याची खात्री करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. धनादेशाद्वारे वीज बिलाचा भरणा करताना आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे. चेक अनादर झाल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.