scorecardresearch

सणासुदीत विजेची मागणी २१ हजार मेगावॉटवर; महानिर्मितीकडून ५,११२ मेगावॉटची निर्मिती

राज्यात १२ जुलै २०२२ रोजी विजेची मागणी १७ हजार ५०६ मेगावॅट होती. परंतु, आता बऱ्याच भागात पावसाने उसंत घेतल्याने पंख्यांसह विजेच्या यंत्राचा वाढलेला वापर व सणासुदीत अनेक घरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे पुन्हा वीज वापर वाढला आहे.

mv light
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : राज्यात १२ जुलै २०२२ रोजी विजेची मागणी १७ हजार ५०६ मेगावॅट होती. परंतु, आता बऱ्याच भागात पावसाने उसंत घेतल्याने पंख्यांसह विजेच्या यंत्राचा वाढलेला वापर व सणासुदीत अनेक घरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे पुन्हा वीज वापर वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी राज्यात विजेची मागणी २० हजार ९२३ मेगावॅट इतकी नोंदवली गेली.

महानिर्मितीच्या ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’च्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला राज्यात विजेची मागणी २० हजार ९२३ मेगावॉट होती. त्यातील ११ हजार ७८५ ‘मेगावॉट’ची निर्मिती राज्यात होत होती, तर केंद्राच्या वाटय़ातून राज्याला ९ हजार १३८ ‘मेगावॉट’ मिळत होते. राज्यात निर्मित होणाऱ्या विजेपैकी सर्वाधिक ५ हजार ११२ ‘मेगावॉट’चे उत्पादन महानिर्मितीच्या विविध कोळसा, जलविद्युत, गॅस, सौर ऊर्जा प्रकल्पातून होत होते. तर अदानी, जिंदाल, आयडियल, रतन इंडियासह इतर खासगी कंपन्यांकडून ५ हजार ४६३ ‘मेगावॉट’ वीज मिळत होती.

वीजवापर आणखी वाढणार

१२ जुलै २०२२ रोजी राज्यात विजेची मागणी १७ हजार ५०६ ‘मेगावॉट’ होती. त्यातील ४ हजार ८०७ ‘मेगावॉट’ विजेचे उत्पादन महानिर्मितीच्या विविध कोळसा, जलविद्युत आणि गॅस प्रकल्पातून केले जात होते. तर इतर वीज केंद्राच्या वाटय़ासह इतर स्त्रोतांकडून घेतली गेली. गणेशोत्सवामुळे बुधवारी अनेक घरात रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. हा विजेचा वापर पुढे आणखी वाढण्याचा अंदाज वीज क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहेत. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-09-2022 at 00:02 IST