महेश बोकडे

नागपूर : राज्यात मध्यंतरी तापमान वाढल्याने विजेची मागणी वीस हजाराहून जास्त मेगावॅटवर गेली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस पडत असून तापमान घट झाल्याने ही मागणी शुक्रवारी १८ हजार ७७३ मेगावॅट अशी खाली आली आहे. ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’च्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास राज्यात विजेची मागणी १८ हजार ७७३ मेगावॅट होती. त्यापैकी केंद्राच्या वाटय़ातून राज्याला ८ हजार ४८८ मेगावॅट वीज मिळत होती. तर राज्यात निर्मित होणाऱ्या विजेपैकी सर्वाधिक ४ हजार ४६५ मेगावॅट वीज महानिर्मितीच्या कोळसा, जलविद्युत, गॅस, सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळत होती. त्यात सर्वाधिक ४ हजार २२४ मेगावॅट वीज औष्णिक विद्युत केंद्रातील होती. तर अदानी, जिंदाल, आयडियल, रतन इंडियासह इतर खासगी कंपन्यांकडून ४ हजार ८५६ मेगावॅट वीज मिळत होती.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कृषीपंपाचा वापर कमी होणे, तापमानात घट झाल्याने विजेवरील पंखे, वातानुकूलित यंत्राचा वापर कमी होण्यासह इतरही कारणाने वीज वापर कमी झाला आहे. राज्यात २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३.१० वाजता विजेची मागणी २१ हजार ७४८ मेगावॅट होती. त्यातील १२ हजार १२ ‘मेगावॅट’ची निर्मिती राज्यात होत होती, तर केंद्राच्या वाटय़ातील राज्याला ९ हजार ६०५ ‘मेगावॅट’ मिळत होते. राज्याला सर्वाधिक ५ हजार ५७५ ‘मेगावॅट’ वीज महानिर्मितीकडून तर अदानी, जिंदाल, आयडियल, रतन इंडियासह इतर खासगी कंपन्यांकडून ५ हजार ५४५ ‘मेगावॅट’ वीज मिळत होती. त्यातच राज्यात २७ एप्रिल २०२२ रोजी २७ हजार ३४७ ‘मेगावॅट’ची मागणी होती. यावेळी राज्यात १७ हजार ९७३ ‘मेगावॅट’ची निर्मिती होत होती.