नागपूर : वाघांच्या हल्ल्यांची भीती अधिक व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्षात देशात मानवी जीवितहानीच्या बाबतीत हत्ती अधिक घातक ठरत असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यांत ३९३, तर हत्तींच्या हल्ल्यांत तब्बल २,८९८ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच, या कालावधीत वाघांच्या तुलनेत हत्तींच्या हल्ल्यांत सुमारे सातपट अधिक लोकांचा जीव गेला.

वाघ आणि हत्तीच्या हल्ल्यातील मृत्यू

हत्तींच्या हल्ल्यांमध्ये ओडिशा (६५०) सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले असून, त्यापाठोपाठ झारखंड (४७१) आणि आसाम (४२७) यांचा क्रमांक लागतो. उर्वरित राज्यांमध्ये मिळून १,३५० जणांचा मृत्यू झाला आहे. याउलट, वाघांच्या हल्ल्यांत महाराष्ट्रात सर्वाधिक २३१ मृत्यू नोंदविण्यात आले असून, उत्तर प्रदेश (५२), मध्य प्रदेश (३९) आणि इतर राज्यांमध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी मानव-वन्यजीव संघर्षाचे बदलते स्वरूप अधोरेखित करते. वाघांच्या हल्ल्यांवर अधिक चर्चा होत असली, तरी मानवी जीवितहानीच्या दृष्टीने मानव-हत्ती संघर्ष अधिक गंभीर बनत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मानव-हत्ती संघर्षामागील कारण

सरकारी आकडेवारीनुसार, हत्तींच्या अधिवासांवर वाढता मानवी हस्तक्षेप, जंगलांचे आकुंचन, शेती व वसाहतींचा विस्तार आणि अन्न-पाण्याच्या शोधात हत्तींचा मानवी वस्त्यांकडे वाढलेला वावर ही मानव-हत्ती संघर्षामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. विशेषतः पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, याच कालावधीत वाघांच्या हल्ल्यांत देशभरात ३९३ जणांचा मृत्यू झाला असला, तरी मानवी जीवितहानीच्या बाबतीत हत्तींचे हल्ले अधिक घातक ठरत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

हल्ले वाढण्यामागची प्रमुख कारणे

जंगलांचे तुकडे पडणे आणि मार्गिका बंद होणे हत्तींचे पारंपरिक स्थलांतर मार्ग रस्ते, रेल्वे, खाणी, धरणे आणि वसाहतींमुळे खंडित झाले आहेत. त्यामुळे कळपांना गावांमधून मार्ग काढावा लागतो आणि संघर्ष वाढतो अन्न व पाण्याची कमतरता जंगलातील अन्नस्रोत कमी झाल्याने हत्ती ऊस, धान, मका, केळी यांसारख्या पिकांकडे वळतात. शेतकऱ्यांशी थेट सामना होऊन अनेकदा जीवितहानी होते. मानवी अतिक्रमण जंगलालगतच्या वस्त्या वाढणे, जंगलात शेती करणे आणि वनक्षेत्रातील मानवी हालचाल वाढल्याने हत्ती व माणसांचा संपर्क वाढला आहे. हत्ती कळपाला धोका जाणवल्यास ते आक्रमक होतात. पिल्लांचे संरक्षण करताना किंवा अचानक समोर माणूस आल्यास हल्ल्याची शक्यता वाढते.

ही राज्य सर्वाधिक प्रभावित

पूर्व आणि ईशान्य भारतातील ओडिशा, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यांत हत्तींची संख्या आणि मानवी वस्ती यांचा जवळचा संबंध असल्याने संघर्ष अधिक तीव्र आहे. महाराष्ट्रात हा प्रश्न तुलनेने मर्यादित असला, तरी विदर्भातील काही भागांत अधूनमधून हत्तींचा वावर दिसू लागल्याने भविष्यात आव्हान वाढू शकते.