परेशने मला कवटाळले होते; अमोल दोडकेची खंत

वेणा तलावात बुडणाऱ्या अकरा जणांपैकी तिघेजण बचावले असून त्यातील अमोल मुरलीधर दोडके याची प्रकृती चांगली आहे. मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत असताना पोलिसांनी अमोलला तलाव परिसरात बोलाविले. तेथे पोहोचताच अमोलच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्याने ‘आपण कुणालाच वाचवू शकलो नाही’ याची खंत व्यक्त केली.

अमोलने तलाव परिसरात एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकाला रविवारी घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने तो नोंदवून घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्व मित्र बाहेर जाण्याची योजना आखत होतो. दुपारपासून योजनेला प्रारंभ झाला. त्यानंतर एका ठिकाणी आम्ही जमलो व कारने अमरावती मार्गावरील पेठ नजिकच्या वेणा तलाव परिसरात आलो. तेथे पार्टी केली आणि त्यानंतर कळमेश्वर येथील पाणी प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या किनाऱ्यावरून अतुल बावणे, अक्षय खांदारे आणि रोशन खांदारे या नावाडय़ांना पकडले. त्यांना तलावात नावेने घेऊन जाण्यासाठी काही पैसे देऊ केले. प्रथम नावेने आम्ही तलावाच्या मध्यभागी गेलो. परत येताना नावेत पाणी शिरायला लागले. त्यावेळी मी सर्वाना नावेतून पाणी बाहेर काढण्याची विनंती करीत होतो. मात्र, कुणीही ऐकत नव्हते. मला आणि मोठा भाऊ रोशन दोडके याला पोहता येत होते. त्यामुळे नावेतून पाणी फेकल्यास आपण आरामात नाव किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो याची खात्री होती.

नावाडय़ांनीही सर्वाना जागेवरच बसण्याचे आवाहन केले. मात्र, पोहता न येणारे घाबरले आणि ते नावेतच आपापल्या जागेवर उभे झाले. त्यामुळे नाव असंतुलित होऊ लागली. त्यामुळे नावेत अधिक पाणी  शिरले व संपूर्ण नावच पाण्याखाली आली. जीव वाचविण्यासाठी सर्वानी पाण्यात उडय़ा घेतल्या. मी कसाबसा किनाऱ्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यावेळी अचानक परेशने मला घट्ट पकडले. मी स्वत:च्या बचावासाठी त्याला हिसका दिला आणि किनाऱ्यावर पोहोचलो. मात्र, आपला मित्र बुडत असल्याचे दिसल्याने पुन्हा पाण्यात शिरलो आणि परेशचा शोध घेऊ लागलो. परेशचा हात पकडण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो पुन्हा सापडला नाही. मी पुन्हा किनाऱ्याकडे परत येत असताना गाळात फसल्यासारखे वाटले आणि आपण निघू शकत नाही, हे जाणवत होते. डोळ्यासमोर अंधार पसरला होता. जाग आली तेव्हा आपण रुग्णालयात होतो, अशी माहिती अमोलने दिली. त्यानंतर अमोलच्या मदतीने एसडीआरएफच्या पथकाने इतर मृतदेह शोधण्याची मोहीम राबविली.

नाव थांबली नसती, तर सर्व वाचले असते

नावेत पाणी शिरल्यानंतर मोठा भाऊ रोशन दोडके आणि आपण सर्वाना नावेतून पाणी काढण्याचे आवाहन करीत होतो. नावेतून पाणी निघाल्यानंतर आम्ही दोघे पोहतच नावेला किनाऱ्यापर्यंत ओढू शकत होतो, परंतु एकानेही नावेतून बाहेर पाणी फेकले नाही. शिवाय नावाडय़ांनी नाव हाकणेही बंद केल्याने नावेत पाणी अधिकच शिरले व अधिकच खोलात गेली, अशी माहितीही अमोलने दिली.