नागपूर : भर दुपारी अचानक मोबाईलवर सायरनसदृश्य अलार्म वाजू लागला आणि काही क्षणांसाठी नागरिक अक्षरश: दचकले. कुणाच्या हातातून मोबाईल पडला, तर कुणी जागीच स्तब्ध झाले. कडक उन्हाच्या तडाख्यात सुरू झालेल्या या अनपेक्षित इशाऱ्याने अनेकांना सुरुवातीला नेमके काय घडले, याचाच अंदाज आला नाही. काहींना वाटले आपला मोबाईल तर हॅक झालेला नाही ना! तर काहींना वाटले आपत्ती व्यवस्थापनाचा तातडीचा संदेश तर नाही ना! मात्र, मोबाईलच्या स्क्रीनवर झळकलेल्या संदेशाने उष्णतेच्या संकटाची गंभीरता अधोरेखित केली.
नेमका काय होता ‘अलर्ट’?
‘पुढील २४ तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळक ठिकाणी रात्र उष्ण राहण्याची दाट शक्यता आहे – मंत्रालय मुंबई’ असा हा इशारावजा मॅसेज होता. भीषण उष्णतेने आधीच हैराण झालेल्या नागरिकांसाठी हा संदेश धक्कादायक ठरला. विशेष म्हणजे हा अलर्ट मोबाईलच्या सायलेंट मोडमध्येही अनेकांच्या फोनवर मोठ्या आवाजात वाजल्याने नागरिक अधिकच चक्रावून गेले.
काही काळ गोंधळाचे वातावरण
दुपारच्या सुमारास नागपूरसह विदर्भातील अनेक भागात तापमान ४४ अंशापलीकडे गेले असताना हा अलर्ट एकाचवेळी हजारो, लाखो मोबाईलवर झळकला. त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या, कार्यालयात असणार्या, बँकांमध्ये, बाजारपेठांमध्ये आणि अगदी बैठकीदरम्यानही अचानक वाजलेल्या या इशाऱ्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला तर काहींच्या हातून मोबाईल पडला, तर अनेकांनी घाईघाईने मोबाईल हातात घेत संदेश वाचण्याास सुरुवात केली. काही नागरिकांना हा ‘भूकंप किंवा युद्धाचा इशारा तर नाही ना!’ असेही वाटून गेले.

त्या अलर्टमागे होते हे कारण
दरम्यान, हवामान खाते आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून उष्णतेच्या लाटेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. विदर्भात सोमवारपासूनच ‘नवतपा’ सुरू झाला आहे आणि नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भातील अनेक शहरे भारतात उष्णतेच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकात होती. या काळात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विदेशात ही यंत्रणा आधीपासूनच
अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशात हीट अलर्ट, पावसाचा अलर्ट यासाठी ही यंत्रणा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. तेथे प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलवर हवामान खात्याकडून असे अलर्ट येत असतात. भारतात कदाचित हे पहिल्यांदाच झाले. या अलर्टमुळे नागरिकांना मात्र प्रथमच मोबाईलवरुन थेट ‘उष्णतेचा धोका’ अनुभवायला मिळाला. अनेकांसाठी हा अनुभव धोकादायक, तर काहींसाठी भविष्यातील बदलत्या हवामान संकटाची गंभीर नांदी देणारा होता.
