वर्धा : शुक्रवारी पहाटे आर्वी येथील भंगार दुकानास आग लागून सात लाखांचा माल भस्मसात झाला. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आश्चर्यकारक खुलासा झाला.
आरोपी आश्विन चवरे हा अशोक जिरापुरे यांच्या भंगार दुकानात कामाला होता. दोन महिन्यांपूर्वी काही कारणाने त्याला कामावरून कमी करण्यात आले. त्याचा राग मनात ठेवून असलेल्या आश्विनने गुरुवारी रात्री लगतच्या दुकानातील ओट्यावर झोपल्याचे सोंग घेतले. रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर गोट्याने जिरापुरे यांच्या दुकानाचे कुलूप फोडले. दुकानातील साहित्य चोरले. जाताजाता दुकानात आग लावून दिली. आग लागल्याचे रस्त्याने जाणाऱ्या प्रमोद ढोले यांना दिसून आल्यानंतर त्यांनी धावपळ करीत सर्वत्र सूचना दिली. आग आटोक्यात आली, पण त्यात बाजूच्या दुकानांनापण मोठी हानी पोहोचली.




तपासात लगतच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात सुर्यवंशी यांच्याकडील कॅमेरात आरोपीची हालचाल टिपल्या गेली. पोलिसांनी लगेच आरोपी आश्विन यास त्याच्या घरून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मालही हस्तगत करण्यात आला.