scorecardresearch

एसटी कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नोकरी

एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी २८ ऑक्टोबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या कालावधीत संपावर होते. संप मिटल्यावर महामंडळाने सर्व बडतर्फ व निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेवर घेतले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नोकरी
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

संप काळात दगावलेल्या, बडतर्फ व निलंबित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला लाभ

महेश बोकडे

नागपूर : एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी २८ ऑक्टोबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या कालावधीत संपावर होते. संप मिटल्यावर महामंडळाने सर्व बडतर्फ व निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेवर घेतले. परंतु, संपात सहभागी व या काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघडय़ावर पडले. महामंडळाने या कुटुंबीयांना दिलासा देत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढ, शासनात विलगीकरणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. महामंडळ, शासनासह तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन केल्यावरही कर्मचारी सेवेवर यायला तयार नव्हते. त्यानंतर संपकर्त्यांवर नोटीस बजावणे, निलंबन, बडतर्फीची कारवाई टप्याटप्याने सुरू करण्यात आली. न्यायालयातही हे प्रकरण गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर संप परत घेतला गेला. न्यायालयाच्या आदेशामुळे संपावरील सर्व बडतर्फ व निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेवर घेतले गेले. परंतु, या काळात आंदोलनात सहभागी असलेल्या व विविध कारणांनी दगावलेल्यांचे कुटुंब उघडय़ावर आले होते. हे कर्मचारी बडतर्फ व निलंबित असल्यामुळे ते तांत्रिकदृष्टय़ा महामंडळाचे कर्मचारी नसल्याने त्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नोकरीही देणे शक्य नव्हते.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यापुढे लातूर, परभणी, सोलापूर विभागातील प्रत्येकी एक अशा एकूण ३ संप काळात दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबतच्या पेचाचे तीन प्रकरणे पुढे आली. त्यावर त्यांनी मानवीय दृष्टिकोनातून संपावर असलेल्या व दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यासाठी निकषही निश्चित करण्यात आले आहे. त्यात बसणाऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे.

भविष्यात या पद्धतीचा लाभ नाही
एसटीने २८ ऑक्टोंबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या कालावधीत संपात सहभागी असताना बडतर्फ व निलंबित असताना दगावलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच हा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण वगळता भविष्यात या पद्धतीचा कुणालाही लाभ दिला जाणार नसल्याचेही महामंडळाने आदेशात म्हटले आहे. संप काळात सुमारे १२४ कर्मचारी दगावल्याचा विविध कामगार संघटनांचा दावा आहे. परंतु, महामंडळ ही संख्या कमी असल्याचे सांगत आहे.
संपावरील बडतर्फ व निलंबित असलेल्या व विविध कारणांनी दगावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात अडचणी होत्या. मानवीय दृष्टिकोनातून हे कर्मचारी संप काळात सेवेत होते असे गृहीत धरून त्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा निर्णय घेतला आहे.– शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 01:01 IST

संबंधित बातम्या