ओसीडब्ल्यू, महापालिकेचा दुजाभाव

अविष्कार देशमुख, नागपूर</strong>

उपराजधानीत पाणी कपात सुरू असताना शहरातील सर्व वस्त्यांना समान पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, ओसीडब्ल्यू आणि महापालिका यामध्ये दुजाभाव करत असून श्रीमंतांच्या वस्त्यांना मुबलक पाणी पुरवले जात आहे, तर दुसरीकडे अनेक गरीब वस्त्यांमध्ये केवळ एक तास पाणी मिळत आहे. पाणीपुरवठय़ातील या दुजाभावावर नागपूरकर संताप व्यक्त करीत आहेत.

यंदा डिसेंबर महिन्यातच शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागेल असे स्पष्ट चित्र होते. मात्र, ओसीडब्ल्यू आणि महापालिकेने याची तमा न बाळगता शहरात अमर्यादित पाणीपुरवठा सुरूच ठेवला. कारण, पुढे  लोकसभेच्या निवडणुका होत्या. नागपूरकरांची मने आणि मते जिंकण्यासाठी विकासकामांकरिता चक्क पिण्याचे पाणी वापरण्यात आले. परिणामी, भूजल पातळी कमालीची खाली गेली. आता त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. पाऊस कमी झाल्याने मृत साठय़ातून पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. परंतु या नामुष्कीनंतरही  पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. शहरातीलच मानकापूर, फ्रेन्डस् कॉलनी, अनंतनगर येथे पाणी कपातीच्या दुसऱ्या दिवशीही सहा ते आठ तास पाणी पुरवले जात आहे. मंगळवारी झोन अंतर्गत येत असलेल्या वस्त्यांमध्येही दहा तास पाणीपुरवठा सुरू आहे, तर दुसरीकडे दक्षिण पश्चिम नागपुरात केवळ एक ते दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे. धरपमेठ झोनच्या अंतर्गत येणाऱ्या सिव्हिल लाईन्स मध्येही मुबलक पाणीपुरवठा होत आहे, तर तिकडे हनुमाननगर झोनमध्ये केवळ दोन तासच पाणी येत आहे.

ओसीडब्ल्यू नव्हे पाणी माफिया कंपनी!

ऑरेंज सिटी वॉटर वर्कस कंपनी ही पाणी माफिया कंपनी बनली आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब वस्त्यांमध्ये ही कंपनी पाणी देत नाही. श्रीमंतांच्या घरी मात्र बरोबर पाणी पोहोचवते. या कंपनीच्या इशारावर महापालिका काम करते. पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न निकाली निघाला नाही तर आम्ही ओसीडब्ल्यूला घेराव करू.

– विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस.

क्षेत्रफळ मोठे असल्याने जास्त पाणी

शहरातील गिट्टीखदानसह काही भागाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने त्या भागात अखेरच्या वस्त्यांपर्यंत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तेथे अधिक वेळ पाणी दिले जाते. तेथे चोवीस बाय सात योजनेमुळे १२ तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तेथील पाणी वितरण करण्याची पद्धत जुनी असल्याने त्यामध्ये बदल करायचे आहेत.

– सचिन द्रवेकर, प्रसिद्ध प्रमुख, ओसीडब्ल्यू.