प्रशासनाच्या सूचनांना उद्योजक संघटनांचा तीव्र विरोध 

नागपूर : संभाव्य तिसऱ्या करोनाच्या लाटेचे भय दाखवून प्रशासन उद्योजकांना चांगलेच सतावत असल्याची त्यांची भावना आहे. बुटीबोरी, हिंगणा व कळमेश्वर येथील उद्योजकांना कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था करा. शिवाय कामगार-कर्मचाऱ्यांचे लसीकरणही स्वखर्चाने करा अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. त्याचा सर्व उद्योजक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात सरकार व प्रशासन पूर्वतयारीला लागले आहे. त्याचा एक भाग म्हणून सध्या औद्योगिक क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या जाचक अटींमुळे आता उद्योजक संघटना दिलेल्या सूचनांचा तीव्र विरोध करीत आहेत.  स्थानिक बुटीबोरी, हिंगणा व कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कारखान्यातील सर्व कामगार व कर्मचाऱ्यांबाबत वरील सूचना प्रशासनाक डून करण्यात आल्या आहेत. परंतु करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीने आधीच उद्योगक्षेत्राचे कंबरडे मोडले असून उत्पादन घटले आहे. टाळेबंदीचा उद्योजकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात आता हा अधिकचा खर्च उद्योजकांना उचलणे कठीण होणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी प्रशासनाच्या सूचनांना विरोध दर्शवला आहे.

उद्योजकांच्या मते एका कामगाराच्या लसीकरणासाठी जवळपास सातशे रुपये मोजावे लागतात. शंभर कामगार असतील तर त्यासाठी सत्तर हजार रुपये खर्च येईल. हा खर्च परवडणारा नाही.

त्याशिवाय लस घेतल्यावर ताप येत असल्याने कामगारांना तीन दिवस सुट्टी द्यावी लागते. त्याचा उद्योगातील उत्पादनावर परिणाम होईल. बायोबबल अर्थात कारखान्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा इतर बाहेरच्या कोणाशीही संपर्क होऊ नये यासाठी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कारखान्यातच करणे खूप कठीण आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात याचा विरोध होत आहे.

कामगारांचे लसीकरण स्वखर्चाने करा. बायोबबल अर्थात त्यांना इतर कोणाच्या संपर्कात येऊ देऊ नका. यासाठी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करा अशाप्रकारच्या सूचना प्रशासनाकडून येत आहे.त्यासाठी वेबिनार देखील आयोजित करण्यात येत आहे.मात्र हे सर्व शक्य होणार नाही. मोठा खर्च याला लागेल.त्यामुळे आम्ही याचा तीव्र विरोध करतो आहोत.

– सी.जी. शेगांवकर, अध्यक्ष हिंगणा एमआयडीसी असोसिएशन