नागपूर : महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील प्रस्तावित ‘गरेपालमा-२’ या कोळसा खाणीला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने सोमवारी पर्यावरण मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे ३४०० रोजगारनिर्मिती होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गरेपालमा-२’ या सुमारे २५८३.४८ हेक्टर परिसरातील या कोळसा ‘ब्लॉक’ची क्षमता खुल्या खदानीतून २२ दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष, तर भूमिगत खदानीची १.६ दशलक्ष ‘मेट्रिक टन’ प्रति वर्ष आहे. रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसीलअंतर्गत ‘गरेपालमा-२’ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वेमार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठवला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकी ५०० ‘मेगावॅट’ क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र संच क्रमांक ८ व ९ (१,००० मेगावॅट), कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८, ९ व १० (१,९८० मेगावॅट) आणि परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० ‘मेगावॅट’ क्षमतेच्या संच क्रमांक ८ (२५० मेगावॅट) असे एकूण ३,२३० ‘मेगावॅट’ क्षमतेच्या वीज उत्पादनासाठी या कोळशाचा वापर होणार आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे ३४०० रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कमी दरात चांगला कोळसा 

२०२२ मध्ये विजेची मागणी वाढल्यावर कोळशाचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे महानिर्मितीला महागडा कोळसा खरेदी करावा लागला होता, तर मोठय़ा प्रमाणावर खुल्या बाजारातूनही वीज खरेदी करावी लागली; परंतु या खाणीमुळे महानिर्मितीला भविष्यात कमी दरात चांगला कोळसा उपलब्ध होणार असल्याने कोळसा तुटवडय़ाबाबत दिलासा मिळण्याची आशा आहे.

उत्खनन पुढील वर्षांपासून

या कोळसा प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी सप्टेंबर २०१९ मध्ये झाली असून वन मंजुरी टप्पा-१ आणि पर्यावरण मंजुरी प्राप्त झाली. आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत वन मंजुरी टप्पा-२ अपेक्षित आहे. त्यानंतर जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात होणार असून साधारणत: सन २०२३ मध्ये प्रत्यक्ष खाण उत्खननास प्रारंभ होईल, असा महानिर्मितीचा दावा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmental approval coal mine relief power generation center ysh
First published on: 12-07-2022 at 00:02 IST