scorecardresearch

झाडांना खिळे ठोकण्याविरुद्ध पर्यावरण संस्थेची मोहीम

झाडांवर खिळे ठोकणे याचा शहर विद्रूपीकरण कायद्यात समावेश असून त्यात संबंधितांवर कारवाईची तरतूद आहे.

जाहिरातीसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज

नागपूर : झाडांवर खिळे ठोकणे याचा शहर विद्रूपीकरण कायद्यात समावेश असून त्यात संबंधितांवर कारवाईची तरतूद आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील कलम २१ अन्वये त्यावर कारवाई होऊ शकते. मात्र, महापालिकेकडून याकडे  सर्रास डोळेझाक केली जाते.  खिळे ठोकल्यामुळे झाडांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे हा प्रकार थांबवण्यासाठी आता एका रेडिओ वाहिनी व पर्यावरण संस्थेने पुढाकार घेतला आहे. मात्र, कारवाईचे अधिकार महापालिकेच्या हातात  या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद तात्पुरताच ठरण्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त अश्विन मुद्गल यांच्या कार्यकाळात महापालिकेने बेकायदेशीर जाहिरात फलक हटवण्याची मोहीम सुरू केली होती. सुमारे तीन महिने चाललेल्या या मोहिमेत मुद्गल यांनी दहाही झोनच्या अधिकाऱ्यांना झाडांवरील बेकायदेशीर फलक हटवण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला झाडांवर जाहिरात लावणाऱ्या आस्थापनांना दंड आणि त्यानंतर थकबाकीदारांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करायची होती. यानुसार अनेक आस्थापनांना त्यावेळी दंड आकारण्यात आला. लहान जाहिरात फलकांसाठी प्रतिदिन १०० रुपये तर मोठय़ा फलकांसाठी ३०० ते ५०० रुपये दंडाची आकारणी करण्यात आली होती. जाहिरात फलक काढण्यासाठी प्रत्येक प्रभागात विभागीय स्वच्छता अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. यामुळे एक  वचक निर्माण झाला होता.  पण मुद्गल यांची बदली झाल्यानंतर ही मोहीम थंडबस्त्यात गेली. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या उद्यान विभागाने झाडांवरील जाहिरात फलके काढण्याची मोहीम सुरू केली, पण दंड आकारण्याबाबत हात आखडता घेतल्याने ही मोहीम जाहिरातदारांनी गांभीर्याने घेतले नाही. विशेष म्हणजे, अनेक हॉटेल्स, दुकान ज्यांनी झाडांचा वापर जाहिरात आणि लाईटिंगसाठी केला आहे, त्यातील काही हॉटेल्स, दुकान हे राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांचे आहे. त्यामुळे तर महापालिका दंड आकारण्यापासून हात मागे घेत नाही ना, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य कमी

झाडांना खिळे ठोकले किंवा जाळय़ा लावल्या तर झाडांना इजा होते.  झाड जिवंत राहण्यासाठी आवश्यक घटक व पाणी मुळांपासून झाडांच्या इतर भागात  पोहचण्यात अडथळे येतात. झाडांची साल निघून गंजलेल्या खिळय़ांमुळे झाडांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे झाडांचे आयुष्य कमी होते. 

‘आदत बदलो,..’ मोहिमेला प्रतिसाद

स्वच्छ शहर सर्वेक्षणात उपराजधानीची कामगिरी माघारली आहे. एक नागपूरकर म्हणून आपल्यासाठी ते भूषणावह नाही. म्हणूनच जेव्हा काही लोकांकडून आम्हाला शहरातील कचरा, झाडांना लावल्या जाणाऱ्या जाहिरातीबाबत माहिती मिळाली तेव्हा आम्ही ‘आदत बदलो, नागपूर बदलेगा’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या अनुषंगानेच झाडांवरील जाहिराती काढण्याचे काम सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हळूहळू आम्ही शहराच्या सौंदर्यीकरणात अडचणीच्या ठरणाऱ्या इतरही बाबींवर लक्ष केंद्रित करू.

– आर.जे. सौरभ, ९३.५ रेड एफएम.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी

दंड केल्याशिवाय जाहिरातदार सुधारणार नाहीत. कारण त्यांना केवळ जाहिरात काढण्यासाठी सांगण्यात येते तेव्हा ते एजन्सीकडे बोट दाखवतात. आम्ही जाहिरातीचे काम एजन्सीला दिले आहे, आमचा काहीही संबंध नाही असे सांगून हात वर करतात. त्यामुळे कायद्यानुसार दंड आणि कारवाई व्हायलाच हवी.

– कौस्तुभ चटर्जी,

संस्थापक ग्रीन विजिल फाउंडेशन कारवाईची मोहीम सुरू

झाडांवरील जाहिराती काढण्याची मोहीम महापालिका, स्वयंसेवी संस्था आणि रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून सुरू आहे. आम्ही जाहिरातदारांना ताकीद देत आहोत. त्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर दंड आणि त्यानंतर कारवाई करणार आहोत.

– अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक, महापालिका.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Environmental organization campaign nailing strict action advertising ysh

ताज्या बातम्या