नागपूर : परस्परांच्या प्रेमात पडल्यानंतर तरुण-तरुणीने घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला. चार वर्षे सुरळीत सुंसार सुरु होता. मात्र, अचानक फेसबुकवरुन एका दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी सूत जुळले. दोघांनीही आपापल्या संसारावर पाणी सोडून पुण्यात पलायन केले. मात्र, भरोसा सेलने दोघांचाही शोध घेऊन त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर विस्कटलेल्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली.

निशांत आणि सुरक्षा (बदललेले नाव) हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. शिक्षण घेताना दोघांची मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण आटोपताच निशांत हा एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला तर सुरक्षासुद्धा एका खासगी कार्यालयात नोकरी करीत होती. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत चर्चा केली. कुटुंबियांनी होकार दिल्यानंतर निशी आणि सुरक्षाचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. त्यांना गोंडस मुलगा झाला. तिघांचाही संसार सुरळीत सुरु असताना निशांतची फेसबुकवरून शिल्पा (काल्पनिक नाव) हिच्याशी ओळख झाली. सुरवातीला दोघांचा फेसबुकवरून ‘चॅटिंग’च्या माध्यमातून संवाद झाला आणि एकमेकांच्या संपर्कात आले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. शिल्पाला दोन मुले असून तिचा पती सधन शेतकरी आहे. शिल्पाला निशांतने भूरळ घातली. दोघेही एकमेकांच्या कुटुंबियांच्या लपून भेटायला लागले. शिल्पासुद्धा निशांतच्या पार प्रेमात वेडी झाली होती.

हेही वाचा >>>वर्धा : भर रस्त्यात तहसील कार्यालय, तिथेच नायब तहसीलदाराची नियुक्ती…

दोघांनी केले पुण्यात पलायन

निशांतशी असलेले अनैतिक संबंधाची कुणकुण पतीला लागल्यामुळे तो तिला त्रास द्यायला लागला. त्यामुळे कंटाळेल्या शिल्पाने निशांतला पुण्यात पळून जाण्याची कल्पना सूचवली. पत्नी आणि मुलासह सुरु असलेल्या संसार सोडून तो शिल्पासोबत पळून जाण्यास तयार झाला. तर शिल्पानेही दोन्ही मुलांचा त्याग करुन नवा डाव मांडण्याचे ठरविले. शिल्पाने पतीची काही रक्कम आणि दागिने घेऊन जून महिन्यात निशांतसोबत पळ काढून संसार थाटला.

पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

शिल्पा आणि निशांत अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी दोन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या. जवळपास दीड महिन्यानंतर दोघेही पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निशांतचे शिल्पाने आणलेल्या पैसे खर्च केले तसेच तिचे दागिनेसुद्धा विकले. एका कंपनीत कामावर जाऊन कसेबसे घर तो चालवित होता. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नागपुरात आणले.

विस्कटलेला संसार पुन्हा सुरळीत

शिल्पा आणि निशांतला भरोसा सेलमध्ये आणण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनाही बोलविण्यात आले. आईशिवाय दोन्ही मुलांची कशी अबाळ होत असल्याचे शिल्पाच्या लक्षात आले तर पती बेपत्ता झाल्यापासून सुरक्षासुद्धा खचली होती. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समिधा इंगळे यांनी शिल्पा व तिच्या पतीची आणि निशांतच्या पत्नीचे समूपदेशन केले. दोघांनीही एकमेकांसोबत न राहण्याचा निर्णय घेतला तर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या चुका पदरात घेतल्या. शिल्पाने पतीची माफी मागितली आणि मुलांसह पतीकडे निघून गेली. निशांतही पत्नी व मुलासह घरी परतला.