देवेश गोंडाणे

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आली. आता ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा ९ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. ही मुख्य परीक्षा ३९ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही आयोगाने पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. त्यामुळे अडीच लाख परीक्षार्थीमध्ये संभ्रम वाढला आहे. 

‘एमपीएससी’ने २६ फेब्रुवारीला ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब २०२१’च्या १०८५ पदांसाठी पूर्व परीक्षा घेतली. आयोगाच्या वेळापत्रकानुसार या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात लागणे अपेक्षित होते. मात्र, संयुक्त परीक्षेची उत्तरतालिकाच ५ मे रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर किमान चार ते पाच दिवसांत निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना संपूनही निकाल जाहीर झालेला नाही. आयोगाच्या वेळापत्रकानुसार, संयुक्त परीक्षेतील विविध पदांची मुख्य परीक्षा ९, १७, २४ आणि ३१ जुलैला होणार आहे. मात्र, अद्याप पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.

अडचण काय?

पूर्व परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर उमेदवारांना त्यांचे अंदाजे गुण माहिती होतात. मात्र, प्रत्येक प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ नेहमी बदलत असतो. त्यामुळे मुख्य परीक्षा देता येईल की नाही, याचा योग्य अंदाज उत्तरतालिकेवरून बांधणे  कठीण जाते. पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावरच मुख्य परीक्षा देता येणार की नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.