नागपूर : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण असलेल्या ई-२० इंधनामुळे वाहनांचे इंजिन खराब होते, वाहनांची कार्यक्षमता घटते किंवा मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड होतो, या चर्चेला ठोस वैज्ञानिक आधार नाही, असा दावा विद्युत केआरजी ऑटो प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संशोधक हर्षद थोरात यांनी केला.

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांनी इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनांचे इंजिन, मायलेज आणि जुन्या वाहनांची ई-२०शी सुसंगतता याबाबत सविस्तर माहिती दिली. देशात ई-२० इंधनाचा वापर वाढत असताना वाहनधारकांमध्ये विशेषतः जुन्या वाहनांच्या बाबतीत भीतीचे वातावरण आहे. इथेनॉलमुळे इंजिन खराब होते, इंधन प्रणालीतील भाग निकामी होतात, मायलेज मोठ्या प्रमाणात घटते किंवा वाहनाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, अशा चर्चा होत आहे. मात्र, इथेनॉल हे स्वतःहून वाहनासाठी घातक इंधन नसून वाहनाची रचना, इंधनाची गुणवत्ता आणि देखभाल यांचा परिणाम अधिक महत्त्वाचा असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

वाहनांमध्ये प्रामुख्याने अंतर्गत ज्वलन इंजिन अर्थात आयसीईचा वापर केला जातो. या इंजिनमध्ये हवा आणि पेट्रोलचे मिश्रण सिलिंडरमध्ये प्रवेश करते. पिस्टनच्या हालचालीमुळे या मिश्रणावर दाब निर्माण होतो. त्यानंतर स्पार्क प्लगमधून ठिणगी निर्माण झाल्यावर मिश्रणाचे ज्वलन होते. या प्रक्रियेत निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे पिस्टन खाली ढकलले जाते. पिस्टनची ही हालचाल क्रँकशाफ्टच्या फिरण्यामध्ये रूपांतरित होते. त्यानंतर गिअरबॉक्सच्या माध्यमातून ही शक्ती चाकांपर्यंत पोहोचते आणि वाहन पुढे सरकते. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता समजून घेताना इंधनाचे रासायनिक गुणधर्म, इंजिनची रचना आणि ज्वलन प्रक्रिया या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात.

प्रत्येक इंधनातून समान प्रमाणात ऊर्जा मिळत नाही. पेट्रोलची ऊर्जा-घनता इथेनॉलपेक्षा अधिक आहे. साधारणपणे एका किलो पेट्रोलमधून ४४ ते ४६ मेगाजूल ऊर्जा मिळते, तर इथेनॉलमधून सुमारे २७ मेगाजूल ऊर्जा मिळते. त्यामुळे समान अंतरासाठी इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापरामुळे इंधनाच्या वापरात काही फरक पडू शकतो. मात्र, याचा अर्थ इथेनॉलमुळे इंजिन खराब होते, असा होत नाही. वाहनाचे मायलेज कमी-जास्त होण्यामागे टायरमधील हवेचा दाब, इंजिनची स्थिती, वाहनाचे वय, वेळेवर होणारी सर्व्हिसिंग, इंजिन ऑइलची गुणवत्ता, वाहन चालवण्याची पद्धत, वाहतूक कोंडी आणि वाहनावरील भार अशा अनेक बाबी कारणीभूत असतात.

इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असल्याचा फायदा

इथेनॉल हे स्वतंत्र रासायनिक संयुग असून त्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजन असतो. ज्वलन प्रक्रियेत त्याचा काही फायदा होतो. पेट्रोलमध्ये ऑक्सिजन नसल्याने ज्वलनासाठी आवश्यक ऑक्सिजन वातावरणातील हवेतून मिळतो. इथेनॉलमध्ये ऑक्सिजनचा समावेश असल्याने त्याच्या ज्वलन प्रक्रियेला वेगळे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरलेल्या इथेनॉलमिश्रित इंधनामुळे ज्वलन प्रक्रिया प्रभावी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे इथेनॉलला पर्यायी किंवा तुलनेने स्वच्छ इंधनाचा पर्याय मानले जाते.

इथेनॉलमुळे इंजिन खराब होते, हा गैरसमज?

ई-२० इंधनाचा वापर करणाऱ्या नव्या वाहनांची निर्मितीच त्या इंधनाची सुसंगतता लक्षात घेऊन करण्यात येत आहे. त्यामुळे ई-२०साठी प्रमाणित वाहनांमध्ये इथेनॉलमुळे थेट इंजिन खराब होण्याचा धोका नसल्याचे थोरात यांनी सांगितले. जुन्या वाहनांच्या बाबतीतही इथेनॉलमुळे तत्काळ इंजिन निकामी होते, असे नाही. मात्र, दीर्घकाळ इथेनॉलमिश्रित इंधनाच्या संपर्कात राहणारे काही रबर, सील किंवा इंधन प्रणालीतील घटक यांच्या झिजेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जुन्या वाहनांमध्ये नियमित देखभाल करणे अधिक महत्त्वाचे आहे.