अमरावती: बंगालमधील निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीची पायाभरणी केली. त्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, बाबरी मशिदीचा पाया कार सेवा करून उखडून फेकला जाईल. जय श्रीरामचा जयघोष करीत मुर्शिदाबादचे नामकरण भगीरथ धाम केले जाईल.
नवनीत यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर ‘मी पश्चिम बंगालमध्ये येत आहे, असा सूचक संदेश दिला होता. पश्चिम बंगालला मी बांग्लादेश बनू देणार नाही. बाबरीच्या नावावर एकही विट रचली गेली, तर मी बंगालमध्ये येऊन उखडून टाकेल, मी बंगालमध्ये येत आहे’, असे नवनीत राणा यांनी या संदेशात नमूद केले होते. ‘बंगाल को बांग्लादेश नहीं बनने दूंगी. बाबरी के नाम पर अगर एक भी ईंट रखी गई तो मैं बंगाल आकर उसे उखाड़ दूँगी. मैं आ रही हु बंगाल..’, नवनीत राणा यांच्या या संदेशाची चर्चा रंगली होती. आता त्यांनी मशिदीचा पाया उखडून टाकण्याचा इशारा दिला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे, तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी शनिवारी अयोध्येत बाबरी मशिदीच्या धर्तीवर नवीन मशिदीची पायाभरणी केली. कडक सुरक्षेत मंचावर मौलवींसह रिबन कापून कबीर यांनी समारंभ पूर्ण केला.
समारंभादरम्यान, “नारा-ए-तकबीर” आणि “अल्लाहू अकबर” च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी दोन लाखांहून अधिक लोक जमले होते. बंगालच्या विविध जिल्ह्यांतील लोक कार्यक्रमस्थळी पोहोचले, काही जण डोक्यावर विटा घेऊन, काही जण ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून तर काही जण रिक्षा किंवा व्हॅनवरून आले होते.
हुमायून कबीर यांनी २५ नोव्हेंबर रोजी घोषणा केली होती की ते अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी बाबरी मशिदीची पायाभरणी करतील. ४ डिसेंबर रोजी तृणमूल काँग्रेसने हुमायून कबीर यांना पक्षातून निलंबित केले होते.
हुमायून कबीर यांनी व्यासपीठावरून गर्दीला संबोधित केले. त्यावेळी व्यासपीठावर “बाबरी मशीद” असे शब्द लिहिलेले होते. –
मालदासह अनेक जिल्ह्यांमधून बांधकाम साहित्याने भरलेले १०० हून अधिक ट्रॅक्टर मशिदीच्या बांधकामस्थळी पोहोचले होते. बेलडांग्यात विविध ठिकाणी बाबरी मशिदीच्या पायाभरणी समारंभाचे पोस्टर लावण्यात आले होते.
