मुख्य परीक्षेच्या तोंडावर मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर 

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १८ डिसेंबरला होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० देणाऱ्या शेकडो उमेदवारांची निवड ही १३ ते १६ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२०१९च्या मुलाखतीसाठी झाली आहे. एमपीएससीला याची कल्पना असतानाही मुख्य परीक्षेच्या तोंडावरच मुलाखतीचा कार्यक्रम सहा दिवसांच्या मुदतीवर जाहीर करण्यात आल्याने आता मुलाखतीची तयारी करावी की मुख्य परीक्षेची उजळणी करावी अशा गोंधळात उमेदवार सापडले आहेत. त्यामुळे मुलाखतीचा कार्यक्रम १८ डिसेंबरनंतर जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ६ डिसेंबरला पुणे,नाशिक आणि औरंगाबाद येथील  महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२०१९ या परीक्षेचा मुलाखतीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. या मुलाखती १३ ते १६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. तर १८ डिसेंबरला एमपीएससीची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० होणार आहे. मुलाखतीसाठी निवड झालेले बहूतांश उमेदवार हे अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२०साठी पात्र आहेत. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेची तयारी करावी की मुलाखतीची असा पेच निर्माण झाला आहे.

यापूर्वी झालेल्या सर्व मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाने १२-१५ दिवस आधी जाहीर केले आहे. परंतु यावेळी फक्त ६ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.   शासनाने हा पेच दूर करावा व मुलाखती किमान १८ डिसेंबरनंतर आयोजित कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

काही उमेदवारांची मुख्य परीक्षा पुणे केंद्रावर आहे. तर मुलाखतीचे केंद्र औरंगाबाद, नाशिक आहे. दोन्ही तारखा एकत्रच आल्यामुळे उमेदवारांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्यात एस.टी.चा संप कायम असल्याने प्रवासासाठीही अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे गैरसोय लक्षात घेता आयोगाने १३ ते १६ डिसेंबर या कालावधी मधील मुलाखती  पुढे ढकलाव्या यासाठी आयोगाला निवदेन देण्यात आले आहे.

– उमेश कोर्राम, अध्यक्ष, स्टुडंट्स राइट्स असोसिएशन ऑफ इंडिया.