घरबसल्या कॅमेराच्या नजरेत वाहन परवान्यासाठी परीक्षा; मुंबई पूर्व ‘आरटीओ’त पथदर्शी प्रयोग; लवकरच राज्यभरात अंमलबजावणी

परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी १४ जून २०२१ पासून घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून शिकाऊ वाहन परवाने देणे सुरू केले.

घरबसल्या कॅमेराच्या नजरेत वाहन परवान्यासाठी परीक्षा; मुंबई पूर्व ‘आरटीओ’त पथदर्शी प्रयोग; लवकरच राज्यभरात अंमलबजावणी
प्रतिनिधिक छायाचित्र

महेश बोकडे

नागपूर : परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी १४ जून २०२१ पासून घरबसल्या ऑनलाईन परीक्षेतून शिकाऊ वाहन परवाने देणे सुरू केले. व्यवस्थेतील दोषांचा फायदा घेत राज्यभरातील दलालांनी सर्रास भ्रष्टाचार सुरू केले होते. त्यावर परिवहन खात्याने मुंबई पूर्व ‘आरटीओ’त घरबसल्या कॅमेऱ्याच्या नजरेत परीक्षेचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. लवकरच राज्यभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे.

परीवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्यातील मुंबई पूर्व या एकमात्र ‘आरटीओ’ कार्यालयाची निवड केली. चार दिवसांपूर्वीपासून येथे या पद्धतीने परवाने देणे सुरू झाले. त्यानुसार उमेदवारांना घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देताना स्वत:च्या संगणकावरील ‘वेब कॅम’ सुरू करावा लागेल. तो सुरू असतानाच ही परीक्षा होईल. परीक्षेदरम्यान उमेदवार कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाहेर गेला वा परीक्षेदरम्यान आक्षेपार्ह हालचाली करताना दिसल्यास ‘सॉफ्टवेअर’ संबंधिताला परीक्षेतून बादच करेल.

या प्रकल्पामुळे ‘आरटीओ’ कार्यालयांतील दलालांकडून एकाची परीक्षा भलताच व्यक्ती देण्याबाबतच्या गैरप्रकारावर आळा बसेल. हा प्रयोग या कार्यालयात यशस्वी ठरल्यास राज्यातील प्रत्येक ‘आरटीओ’ कार्यालयातील घरबसल्या ऑनलाईन परीक्षाही कॅमेऱ्याच्या देखरेखीतच होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या बदलासाठी परिवहन खात्याने राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी)कडून वाहन व सारथी ४ या संगणकीय प्रणालीत बदल करून घेतले होते.

आधी काय गैरप्रकार घडले?

परिवहन खात्याने ‘आरटीओ’ कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी वाहन चालवण्याचा शिकाऊ परवान्यासाठी घरबसल्या ऑनलाईन परीक्षा व घरपोच परवाने देणे सुरू केले. लोकसत्ताने स्टिंग ऑपरेशन करून नागपूर कार्यालयात काही दलाल पैसे घेऊन उमेदवाराऐवजी दुसऱ्यालाच परीक्षेत बसवून परवाने देत असल्याचे उघडकीस आणले होते. यात एका अंधालाही वाहन चालवण्याचा परवाना मिळाला होता.

परिवहन आयुक्त कार्यालयाने ‘एनआयसी’कडून ‘सॉफ्टवेअर’मध्ये बदल करून घेतले. त्यामुळे पथदर्शी प्रकल्प म्हणून मुंबई पूर्व ‘आरटीओ’ कार्यालय परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरबसल्या वाहन चालवण्याचा शिकाऊ परवान्याची परीक्षा आता कॅमेऱ्याच्या पाहणीत द्यावी लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तो राज्यभरात राबवला जाणार आहे.

 डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Examination driving license home experiment mumbai east rto implementation ysh

Next Story
‘जियो पारशी’ला ‘आयव्हीएफ’ लाभदायक; ३७६ पैकी २९० बालकांचा जन्म कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञानाच्या मदतीने
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी