नागपूर : हृदयाची रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झालेल्या ७२ वर्षीय महिलेवर नागपुरात ‘एक्सायमर लेझर कोरोनरी अँजिओप्लास्टी’ करण्यात आली. विदर्भातील अशा प्रकारची ही पहिलीच प्रक्रिया असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. विशेष म्हणजे, या महिलेच्या रक्तवाहिनीतील कठीण अडथळा दूर करण्यासाठी लेझर, रोटाब्लेशन आणि इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी अशा तीन प्रगत तंत्रांचा एकाच वेळी वापर करण्यात आला.
रुग्णाला नेमका काय त्रास होता?
रायपूर येथील ७२ वर्षीय महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. छातीत वेदना होत असल्याने केलेल्या तपासणीत हृदयाची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद असल्याचे आढळले. रक्तवाहिनीतील अडथळा कठीण आणि कॅल्शियमयुक्त असल्याने उपचार गुंतागुंतीचे होते.
लेझर अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
‘एक्सायमर लेझर कोरोनरी अँजिओप्लास्टी’मध्ये अतिनील लेझर ऊर्जेच्या मदतीने रक्तवाहिनीतील कठीण थर आणि रक्ताच्या गुठळ्यांवर उपचार केला जातो. अतिशय कमी कालावधीची स्पंदने वापरली जात असल्याने आसपासच्या रक्तवाहिनीला कमीत कमी इजा करून अडथळा मोकळा करण्यास मदत होते.
तीन वेगवेगळी तंत्रे का वापरावी लागली?
महिलेच्या रक्तवाहिनीतील कॅल्शियमयुक्त अडथळा गुंतागुंतीचा होता. प्रथम लेझरचा वापर करण्यात आला. त्यानंतर हिऱ्याचा सूक्ष्म थर असलेल्या उपकरणाद्वारे ‘रोटाब्लेशन’ करण्यात आले. पुढे ध्वनीदाब लहरींच्या साहाय्याने कॅल्शियमचे कठीण थर फोडण्यासाठी ‘इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ करण्यात आली. त्यानंतर स्टेंट बसविण्यात आला.
यापूर्वीही लेझरचा वापर झाला होता का ?
नागपुरातील मधुमेह असलेल्या ६३ वर्षीय पुरुषाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुमारे सहा आठवड्यांपूर्वी लेझर अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसविण्यात आला होता. दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे तंत्र कोणत्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते ?
अत्यंत कठीण कॅल्शियमयुक्त अडथळे, पूर्वी बसविलेल्या स्टेंटमधील अडथळे किंवा हृदयविकाराच्या झटक्यावेळी रक्ताची मोठी गुठळी असलेल्या निवडक रुग्णांमध्ये या तंत्राचा उपयोग होऊ शकतो. या प्रक्रियेबाबत डॉ. प्रशांत जगताप, डॉ. पीयूष चौदळवार, डॉ. मिथिलेश कुलकर्णी, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. श्रीकांत कोठेकर, डॉ. सचिन धोमणे आणि डॉ. राजेश मुंधाडा यांनी माहिती दिली. ही प्रक्रिया नागपुरातील विवेका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली.
