वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील पवनगाव झुडपी जंगल परिसरातील नाल्यात वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात वाघाची नखे, मिशा, दात हे अवयव मात्र गायब आहेत.

पवनगाव परिसरात गुराख्याला दुर्गंधी आल्याने त्याने पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरचा भाग दिसला. तर आजूबाजूला काही अवयव आढळून आले. गुराख्याने तात्काळ वनखात्याला माहिती दिली. त्यानंतर वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सर्व १४ तुकडे जमा करून पाहणी केली असता पायाची नखे, मिशा गायब होते. तर जबड्याचा काही भाग कापलेला होता. केवळ चार दात होते. या वाघाची शिकार ६ ते ७ दिवसांपूर्वी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वनखात्याने घटनेची चौकशी सुरू केली आहे.