संहिता वाचन, पात्रांचा शोध, तालमीत विद्यार्थी दंग

विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू असूनही ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी विद्यार्थी जोमाने तयारीला लागले आहेत. परीक्षेचा काळ असूनही नाटकाचा शोध, संहितेचे वाचन, पात्रांचा शोध आणि तालीम विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. लोकांकिकेची प्राथमिक फेरी येत्या २ आणि ३ डिसेंबरला शहरात होत आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या असून जानेवारी महिन्यातही बी.कॉम, बी.एस्सी., बी.ए. आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू राहणार आहेत. मात्र, परीक्षेच्या काळातही विद्यार्थ्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. वेळ मिळेल तशी तयारी करण्यावर विद्यार्थी भर देत आहेत. त्यासाठी नाटक लिहून घेणे किंवा उपलब्ध नाटकांचा शोध घेणे, कमीत कमी पात्र असलेल्या नाटकांवर भर देणे, नाटकासाठी आवश्यक पात्र शोधणे आणि मुख्य म्हणजे वेळात वेळ काढून नाटकाची तालीम केली जात आहे. काही झाले तरी नाटक करायचेच, असा निर्धार करूनच विद्यार्थी लोकांकिकेच्या स्पर्धेत उतरले आहेत.

दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी लोकांकिकेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे म्हणून अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होणे याचा विचार ‘नॅक’च्या मानांकनाच्यावेळी केला जातो. ‘नॅक’द्वारे अशा महाविद्यालयांना काही गुण दिले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असा प्रयत्न असतो. त्यामुळे महाविद्यालयेही लोकांकिकेत चमू पाठवण्यासाठी उत्सुक आहेत.  लोकांकिकेसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढावा, असाही महाविद्यालयांचा उद्देश असतो.

लोकांकिका आमच्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आजच आम्ही लोकांकिकेसाठी नोंदणी केली असून नाटकही मिळवले आहे. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. कोणाच्या कधी परीक्षा संपतील, याची माहिती घेतली. नाटकाच्या दिवशी परीक्षा नसेल, अशा विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू आहे. परीक्षा असली तरी लोकांकिकेत भाग घेण्याची परंपरा आम्हाला खंडित करायची नाही.

– रोहित घांगरेकर, विद्यार्थी, संताजी महाविद्यालय

लोकांकिका स्पर्धा आमच्यासाठी कायम आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे त्याची तयारी आम्ही आधीपासूनच आरंभली होती. प्रश्न फक्त परीक्षेचा होता. त्यामुळे अर्धी तयारी आधीच करून ठेवली होती. माझा पेपर २६ नोव्हेंबरला संपला तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा २९ नोव्हेंबपर्यंत आहेत. त्यानंतर तयारीला आणखी वेग येईल.

– वैदेही चौरे, ललित कला विभाग, नागपूर विद्यापीठ

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलीकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.