आता मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा; उच्च न्यायालयाचा निकाल

नागपूर : एका ९ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून  बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना बुलढाणा सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली असून आता त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींची शिक्षा कमी करण्यात येणार नसल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईन अशी आरोपींची नावे आहेत. २७ एप्रिल २०१९ ला बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी ९ वर्षांची होती.  २६ एप्रिल २०१९ च्या रात्री  घरी सगळे झोपले असताना आरोपी मुलीच्या घरासमोर  दारू पित होते. काही वेळाने ते निघून गेले. रात्री एक वाजता पीडितेचे वडील झोपेतून उठले असता मुलगी जागेवर नव्हती. आरोपींनी तिचे अपहरण करून नेले व तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला. सत्र न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे तपासून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. त्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या याचिकेवर न्या. विनय देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपींची फाशी रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांची शिक्षा माफ करण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे, आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा आणि अ‍ॅड. ए.ए. धवस यांनी बाजू मांडली.