टाटा ट्रस्टचे सहकार्य; रोजगारही मिळणार
महेश बोकडे, लोकसत्ता




नागपूर : टाटा ट्रस्टने नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी बेकरीचा आगळा- वेगळा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याची सूत्रे मनोरुग्णांच्या हाती राहील. येथे निर्मित ब्रेड, टोस्टचा पुरवठा पहिल्या टप्प्यात मनोरुग्णांनाच होईल. यातून मिळणारे उत्पन्न बेकरी चालवणाऱ्या रुग्णांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
मनोरुग्ण म्हटले तर आजही प्रत्येकाच्या डोळय़ापुढे रस्त्यावर मळलेले कपडे घालून फिरणारे, चित्र-विचित्र हावभाव व हालचाली करणारे, अशी प्रतिमा आपल्यासमोर येते. समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक नसतो. त्यांच्यावर नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार केले जातात. अनेक रुग्ण बरेही होतात. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार उपचार सुरूच ठेवल्यास ते सामान्य आयुष्य जगू शकतात. येथील मनोरुग्णालयातील सुमारे दोनशे रुग्ण बरे झाल्यावरही त्यांना कुटुंबीय घरी नेले नाही. त्यामुळे त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. अशा रुग्णांना आत्मनिर्भर करण्यासाठी टाटा ट्रस्टने मनोरुग्णालयात बेकरीचा प्रकल्प हाती घेतला आहे. दीड महिन्यापूर्वी तो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. परंतु करोनाच्या साथीमुळे बेकरी बंद करण्यात आली. परंतु आता जिल्ह्यात करोनाचा प्रभाव ओसरल्याने पुढील आठवडय़ापासून ही बेकरी पुन्हा सुरू केली जाणार आहे. येथे ब्रेड व टोस्ट तयार करण्याचे काम बरे झालेले रुग्णच करणार आहे. त्यासाठी दोन महिला व दोन पुरूष अशा चार जणांना प्रशिक्षण देण्यात आले. बेकरीत रोज सुमारे ३५ ते ५० किलो ब्रेड, पाव आणि टोस्ट तयार केले जाणार आहे.
ते मनोरुग्णालयातील रुग्णांना वाटप करण्यात येईल. त्यामुळे मनोरुग्णालयाची महिन्याला सुमारे ५० हजार रुपयांची बचत होईल. ही रक्कम मनोरुग्णालय प्रशासन ब्रेडसाठी लागलेला कच्चा मालाचा खर्च वजा करून बेकरी चालवणाऱ्या रुग्णाच्या बँक खात्यात वळते करणार आहे. त्यामुळे मनोरुग्णांना रोजगार मिळेल.
तज्ज्ञांकडून प्रशिक्षण
टाटा ट्रस्टने सदर येथील निराली बेकरीच्या मदतीने मनोरुग्णालयातील चार मनोरुग्णांसह दोन टाटा ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना ब्रेड-टोस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. प्रथम रुग्णालयाला लागणारेच बेकरीचे साहित्य येथे तयार होणार आहे. परंतु कालांतराने मागणीनुसार बाहेर विक्रीसाठी ब्रेड- टोस्ट पुरवण्याची रुग्णालय प्रशासनाची तयारी आहे. त्यामुळे येथे आणखी गरजेनुसार इतरही रुग्णांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. परंतु आता येथील प्रशिक्षीत व्यक्तीच प्रशिक्षण देईल.
१,५०० चौरस फुटात बेकरी
टाटा ट्रस्टने प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनासोबत संयुक्तरित्या सुमारे २५ लाख रुपये खर्च करून मनोरुग्णालयात १,५०० चौरस फूट जागेवर अद्ययावत बेकरी तयार केली. त्यासाठी मिक्सर, ओव्हन, ब्रेड कटर, स्टीलचे ट्रे यासह इतरही आवश्यक साहित्य व यंत्र उपलब्ध करून दिले.
मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने येथे अद्यावत बेकरी तयार करण्यात आली आहे. दीड महिन्यापूर्वी करोनामुळे सुरू केलेली बेकरी बंद करावी लागली होती. परंतु पुढच्या आठवडय़ापासून पून्हा बेकरी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ही बेकरी आवश्यक पदार्थ तयार करण्यासाठी दोन पाळीत चालवण्याचा प्रयत्न आहे. – डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.