चार कंपन्यांच्या समूहाला २२१ कोटींचे कंत्राट

मेट्रो रेल्वेसारख्या मोठय़ा प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी ‘जनरल कन्सल्टंन्ट’ (तज्ज्ञ सल्लागार)   कंपनीची नियुक्ती अखेर नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने उशिरा का होईना केली आहे. फ्रान्स, अमेरिका आणि भारत अशा तीन देशांतील चार कंपन्यांच्या समूहाला हे काम २२१ कोटी रुपयांमध्ये  देण्यात आले आहे. यामुळे मेट्रोच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता तसेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित यांनी पत्रकारांच्या मेट्रो प्रकल्प पाहणी दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली. त्याच प्रमाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामावर देखरेख करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ५ डी प्रणालीचे काम मुंबईच्या ओरियन प्रा. लि. या कंपनीकडे देण्यात आल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाच्या दीड वर्षांच्या कामकाजातील हे दोन्ही निर्णय महत्त्वपूर्ण मानले जातात.

Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
Quick Heal Technologies, a cybersecurity software company, kailash sanjay katkar
वर्धापनदिन विशेष: संगणकीय डॅाक्टर… ‘क्विक हिल’चे काटकर बंधू
loksatta. pune, Anniversary, Special article, mental health, society by psychiatrist and actor Dr. mohan agashe
वर्धापनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी

८ हजार ६६० कोटी रुपयांच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारसह जर्मन बँकेने ३७५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम क्षेत्रातील कामाला वेग आला असून जमिनीवरून धावणाऱ्या रेल्वेसाठी एक किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. फक्त आता त्यावर रुळ टाकण्याचे काम शिल्लक आहे. मेट्रोच्या कामाला एकीकडे जोमाने सुरुवात झाली असताना दुसरीकडे प्रकल्पासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘जनरल कन्सल्टंन्ट’ची नियुक्ती करण्यात आली नव्हती, त्यामुळे प्रकल्पाच्या एकूणच गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले होते. व्यवस्थापनाने अलीकडेच या नियुक्तीसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या. त्यात देश आणि विदेशातील मेट्रो रेल्वेच्या कामाचा अनुभव असणाऱ्या बडय़ा कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. तज्ज्ञांच्या चमूंकडून अखेर यापैकी  चार कंपन्यांमिळून तयार करण्यात आलेल्या एका समूह कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या चार कंपन्यांमध्ये फ्रान्सची सिस्ट्रा, एजस,अमेरिकेची ई-कॉम आणि भारतातील रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली राईट यांचा समावेश आहे. या कंपन्यांची निविदा सर्वात कमी किमतीची असल्याने त्यांना हे काम देण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले. २२१ कोटींचे हे कंत्राट असून ही कंपनी प्रकल्पाच्या सर्वच क्षेत्रासाठी मार्गदर्शन करणार आहे.

२४ बाय ७ काम सुरू

मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम दिवस-रात्र सुरू आहे. बहुतांश कामे ही रात्रीच्या वेळी केली जाते. कास्टिंग यार्डमधील सेंगमेन्ट तयार करण्याचे काम असो किंवा वर्धा मार्गावरील खांब उभारणीचे काम असो. नागपूरचे तापमान या कामात अडथळा निर्माण करणारे ठरले असल्याने रात्रीच्या कामावर भर अधिक दिला जातो आहे. सेगमेन्ट तयार करताना उन्हामुळे त्याला तडा जाण्याची भीती असते, त्यामुळे रात्रीच त्याची प्रक्रिया केली जाते. प्रकल्पाच्या कामावर सुरक्षिततेवरही अधिक भर देण्यात आला आहे. बांधकाम स्थळी आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपायोजना करण्यात आल्या आहे. वर्धामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याव्दारे वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

जमिनीवरील एक किलोमीटरचा मार्ग तयार खापरी ते ऑटोमोटिव्ह हे अंतर १४ किलोमीटरचे असून या मार्गावरचे शेवटचे स्थानक खापरी आहे. चिंचभवन पुलाजवळून मेट्रो पुलावरून धावणार आहे. त्याआधी ती जमिनीवरून धावेल. त्यासाठी मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एक किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. खापरी भागात दोन पुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोसाठी रेल्वे रूळ हे भारतीय रेल्वेच्या धरतीवरच असणार आहे तर पुलावरून धावणाऱ्या मेट्रोच्या रुळामध्ये गिट्टी असणार नाही.

कारागृहाच्या सुरक्षेला धोका नाही

वर्धामार्गावरील कारागृहाच्या परिसरातून मेट्रोचा मार्ग धावणार असला तरी तेथील सुरक्षिततेची  पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. कारागृह भिंतीपासून २०० मीटर दूरवरून हा मार्ग जाणार आहे. यासंदर्भात कारागृह प्रशासनाला विश्वासात घेऊनच पुढील काम केले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

मेट्रो भवनाचे काम ६०%

मेट्रो भवनाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. रामझुल्याच्या बाजूने मेट्रो धावणार असून तेथे खांब उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

१५ दिवसांत सीताबर्डी जंक्शनचे काम

वर्धामार्गावरील कामाने गती घेतल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात सीताबर्डीतील मुंजे चौक येथे मेट्रो जंक्शनच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. येत्या १५ दिवसांत जमिनीतील माती चाचणीच्या कोमाला सुरुवात होणार आहे. वर्धामार्गावरील नीरी प्रवेशव्दारापुढेही खांबाचे काम लवकरच सुरू होणार आहे. न्यू एअरपोर्ट, खापरी स्थानकाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. नव्याने बदलण्यात आलेल्या आराखडय़ानुसार अजनी स्थानक तेथील रेल्वेस्थानकाजवळ तर राहाटे कॉलनी स्थानकाची जागाही उत्तर अंबाझरी मार्गाकडे सरकवण्यात आली आहे. दोन स्थापनांमधील अंतर ८५० ते १००० मीटर असणार आहे.

प्रकल्पाची प्रगती : पाच खांबांचे काम पूर्ण

खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक या दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या मार्गातील खापरीकडील पाच खांबांचे (पिलर्स)चे काम पूर्ण झाले आहे. खापरी ते सीताबडी (मुंजे चौक) या दरम्यान असे एकूण २७० खांब लागणार आहेत. २२ मीटर उंचीचे हे खांब असून त्यावर रूळ टाकल्यावर त्याची उंची आणखी २ ते ३ मीटर्सनी वाढणार आहे. पुढच्या काळात महिन्याला १५ ते १८ खांब उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे या प्रकल्पाचे प्रमुख देवेंद्र रामटेकेकर यांनी पत्रकारांना सांगितले. दोन्ही खांबांवर नंतर सिमेंटच्या सेगमेन्ट टाकण्यात येईल. तीन मीटरचे एक सेगमेन्ट असणार आहे. जुलै महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. वर्धा मार्गावरील ५.६ किमीच्या कामाला ३० मे २०१५ ला सुरुवात झाली होती. तेथे पहिला खांब १६ एप्रिलला उभारण्यात आला.

‘डबल डेकर’ पुलाचे काम सुरू

वर्धा मार्गावर हॉटेल प्राईडजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर मेट्रो रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डबल डेकर’ उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला असून डिझाईनचे काम एल अ‍ॅण्ड टीने केले आहे. त्याच्या फाऊंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेला छत्रपती चौकातील उड्डाण पूल नव्या रचनेत अंशत: तोडण्यात येणार असून गरजेनुसार त्याला तोडण्यात येणार आहे. हे काम सप्टेबर-ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, असे प्रकल्प प्रमुख देवेंद्र रामटेकेकर यांनी सांगितले.

कास्टिंग यार्डमध्ये २३९० सेगमेंटचे काम

मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी सिमेंटचे सेंगमेंट तयार करण्याचे काम वर्धामार्गावरील मेट्रोच्या कास्टिंग यार्डमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ एकर जमिनीवर हा यार्ड उभारण्यात आला असून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून महिन्याला १८० स्पॅन (१० सेंगमेन्टचा समूह) येथे तयार केला जातो. एका सिमेंन्ट सेगमेंटची लांबी ३ मीटर असून उंची २ मीटर व वजन ३७ टन आहे एकाच वेळी चार सेंगमेन्ट तयार केले जातात. २८ मीटरच्या एका स्पॅनमध्ये सिमेन्टचे दहा सेगमेन्ट बसतात. हे सेगमेन्ट नंतर दोन पिल्लरच्या मध्ये स्लॅबसारखे टाकले जातात. व त्यावर रूळ लावले जातात, असे या प्रकल्पाचे उपमहाव्यवस्थापक एम.आर.पाटील यांनी सांगितले.

मेट्रो वेळेत धावणार

मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे आतापर्यंतचे सर्व काम नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरू असल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार याची खात्री आहे. खापरी ते ऑटोमोटिव्ह या दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. कास्टिंग यार्डमध्येही सेगमेन्ट तयार होत आहेत. या मार्गावरील जमिनीवरील मार्गाचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले आहे. एक किलोमीटपर्यंत रूळ टाकू शकू इतकी कामाची प्रगती झाली आहे. आतापर्यंतच्या कामावर आपण समाधानी आहोत, पुढच्या टप्प्यात वर्दळीच्या ठिकाणी काम सुरू होणार असले तरी यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होणार नाही.

ब्रीजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन