राजेश्वर ठाकरे
नागपूर : करोनाची तिसरी लाट ओरसली आणि रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवाशांना चादर, उशी, ब्लँकेट प्रवास भाडय़ातूनच उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. परंतु मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेमध्ये अजूनही या वस्तू उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. यासाठी प्रवाशांना अतिरिक्त अडीचशे रुपयांचा भुर्दंड बसतो आहे. यासंदर्भात एका सनदी लेखापालांनी रेल्वेला स्पष्टीकरण मागितले, मात्र गेल्या २० दिवसांपासून रेल्वेने उत्तरच दिले नाही.
करोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मार्च २०२० मध्ये रेल्वेगाडय़ांत प्रवाशांना चादर, उशी, ब्लँकेट देणे बंद केले होते. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा रेल्वेने केली. मात्र, यानंतरही नागपूर ते मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना ब्लँकेट, उशी, चादर उपलब्ध करून दिल्या जात नाही. याबाबत प्रवाशांनी तक्रारी केल्या. त्यापैकी एक तक्रार ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे. नागपुरातील सनदी लेखापाल जयंत जवरानी पाच सहप्रवाशांसह ७ एप्रिल २०२१ रोजी बी-७ दुरांतो एक्सप्रेसने मुंबईला जात होते. प्रवासादरम्यान त्यांना ब्लँकेट, उशी आणि चादर मिळाली नाही. यामुळे त्यांनी ५०० रुपयांत चादर, ब्लँकेटचे दोन संच विकत घेतले. रेल्वेने तिकिटाचे पूर्ण भाडे आकारले, त्यात ब्लॅकेट, उशी आणि चादरचे भाडेही समाविष्ट आहे. असे असतानाही प्रवाशांनी या वस्तूंसाठी अतिरिक्त पैसे का खर्च करावे, असा सवाल त्यांनी केला आहे.
सनदी लेखापालांचा सवाल
पूर्ण प्रवास भाडे आकारूनही चादर, उशी, ब्लँकेट का दिली जात नाही, खासगी कंत्राटदाराला चादर, ब्लँकेट विकण्याची परवानगी कशी दिली, असे प्रश्न सनदी लेखापाल जावरानी यांनी रेल्वेला विचारले आहे.
सेवाग्राम’ आणि ‘विदर्भ’मध्ये चादर, ब्लँकेट
सेवाग्राम, विदर्भ एक्सप्रेसमध्ये एसी थ्री आणि टू टियरमध्ये चादर, उशी, ब्लँकेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र, नागपूर ते मुंबई दुरांतोमध्ये या वस्तू अद्यापही उपलब्ध करून दिल्या जात नाही. ८ मार्च २०२२ ला या गाडीसाठी रेल्वेने बेडरोल पुरवण्यासंदभार्तत करार केला. १० मार्चला याबाबतची अधिसूचना रेल्वे बोर्डाने काढली. मात्र, अद्यापही या वस्तू मिळत नसल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.
‘डिस्पोजेबल बेडरोल’साठी दरपत्रक हवे
दुरांतोमध्ये खासगी कंत्राटदार ‘डिस्पोजेबल बेडरोल’ विकत आहे. प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ विकू नये, या अटीवर कंत्राटदाराला परवानगी देण्यात आली. पण तो नेमके काय विकू शकतो आणि त्याचे दर काय असतील, हे यासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले नाही. चादर, ब्लँकेट, उशी (बेडरोल) पुरवठय़ासाठी कंत्राट देतेवेळी याबाबतचे विवरण दिले जाते, दरपत्रकही दिले जाते. मात्र, गाडीत फिरून वस्तू विकणाऱ्यांसाठी असे काहीच नियम नाहीत.
टप्प्याटप्प्याने सुविधा पुरवणार
सर्व रेल्वेगाडय़ांमध्ये बेडरोलची सुविधा सुरू झालेली नाही. तीन वर्षे ही सुविधा बंद होती. या वस्तू टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दुरांतो एक्सप्रेसमध्ये डिस्पोजेबल बेडरोल उपलब्ध करण्यात आले आहेत. – कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.