बुलढाणा: जन्मजात मूकबधिर असलेल्या ‘त्या’ व्यक्तीने निधनानंतरही इतरांच्या जीवनात प्रकाश फुलविण्याची तजवीज करून ठेवली. देऊळगाव राजा अक्करबोटे कुटुंबाच्या अनोख्या सामाजिक बांधिलकीची ही कथा आहे.
तालुका पत्रकार संघाचे सदस्य ललेश अक्करबोटे यांचे लहान बंधू विनोद अक्करबोटे (वय पन्नास) हे जन्मजात मूकबधिर. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दैवाने त्यांना बोलण्याची व ऐकण्याची शक्तीच दिली नाही. जन्मजात मूकबधिरपणाचा शाप लाभलेल्या विनोद यांना मात्र तल्लख बुद्धीचे वरदान मिळाले होते. केवळ खाणाखुणा व इशाऱ्यानी ते आपल्या दुकानाचा व्यवहार सांभाळत होते. विनोदचे त्यांच्या हयातीत, सुखदुःखात त्यांचा सर्व परिवार त्यांना नेहमी साथ द्यायचा.
हेही वाचा – तर बजरंगबली रवी राणांचा कणा मोडतील, असे वडेट्टीवार का म्हणाले?
मृत्युपश्चात विनोद यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय लल्लेश अक्करबोटे व त्यांच्या परिवाराने घेतला. जायंटस परिवाराचे डॉक्टर रामदास शिंदे व डॉक्टर अशोक काबरा यांना माहिती दिली. त्यांनी संपर्क साधल्यावर जालना येथील गणपती नेत्रालयाच्या चमूने विनोदचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले. चमूमध्ये डॉक्टर सुप्रिया सोनवणे, सतीश बुट्टे, रवी शिंदे , शिवाजी जोशी यांचा सहभाग होता. जन्मजात मूकबधिर असलेल्या विनोदने मरणोत्तर नेत्रदान करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.