अमरावती : राज्यात सरकारकडून अंधत्व निवारण कार्यक्रमाचा गाजावाजा केला जात असला, तरी नेत्रदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गेल्या वर्षी केवळ २ हजार २२८ जणांनी नेत्रदान केले असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान २ हजार २२८ लोकांचे ४ हजार ४५६ बुब्बुळ (कॉर्निया) दान झाले व त्यापैकी २ हजार ४७७ बुब्बुळांचे प्रत्यारोपण होऊ शकले. महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ८.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. परंतु त्यातून फक्त २ हजार २२८ लोकांचे नेत्रदान झाले. राज्यात जवळपास ७७ नेत्रपेढी, २४३ नेत्र प्रत्यारोपण केंद्र व ९२ नेत्र संकलन केंद्र आहेत. बहुतांशी ठिकाणी नेत्रपेढीची केवळ कागदोपत्री नोंद आहे. राज्यात फक्त २०-२५ नेत्रपेढी नेत्रदानाचे नियमित काम करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात २०२१-२२ मध्ये ६ हजार ५०० लोकांच्या नेत्रदानाचे उद्दिष्ट असताना ३ हजार १७२ जणांनी नेत्रदान केले आणि केवळ १ हजार ९४७ नेत्र प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होऊ शकल्या. दरवर्षी नेत्रदानाचे निम्मे उद्दिष्टही पार केले जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत जवळपास नोंदणीकृत ३५ हजार लोक दृष्टी मिळण्यापासून वंचित आहेत. यामध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक बालकांचा समावेश आहे. हेही वाचा.‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतेत! आरोग्य विभागाकडून जमा केल्या जाणाऱ्या बुब्बुळांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने नेत्रदानाच्या माध्यमातून नेत्रपटल जमा करण्याचा आरोग्य विभागाचा आलेख घसरत चालला आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून बुब्बुळ मिळाल्यास त्याच्या प्रत्यारोपणातून हजारो अंध लोकांना दृष्टी मिळणे शक्य असतानाही त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. अपघातामुळे, जन्मत: किंवा आजाराने आलेल्या अंधत्वामुळे अनेकाना दृष्टिहीन जीवन जगावे लागते. नेत्रदानाच्या माध्यमातून बुब्बुळे उपलब्ध झाल्यास प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेतून हे अंधत्व घालवता येते. नेत्रदानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून ही चळवळ गतिमान करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. हेही वाचा.यवतमाळ : महागाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, ३० लाख रोख व १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले; महिलांना अमानुष मारहाण अमरावतीतून ७५ लोकांना दृष्टीलाभ अमरावती जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये २९ लोकांचे नेत्रदान म्हणजे ५८ बुब्बुळ दिशा इंटरनॅशनल आय बँकेमध्ये दान करण्यात आले तर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात २४ लोकांचे म्हणजे ४८ बुब्बुळदान झाले. अंधत्व आलेल्या ३३ लोकांना हे डोळे बसवण्यात आले. एकूण ७५ लोकांना अमरावती मधून दान झालेल्या डोळ्यांमुळे दृष्टी लाभ झाला आहे. हेही वाचा.अजित पवारांची अवस्था “धरलं तर चावते..” अशी, वडेट्टीवार यांची टीका मृत्यूनंतर साधारणपणे सहा ते आठ तासात बुब्बुळ काढणे आवश्यक असते. अंधश्रद्धा तसेच योग्य माहिती अभावी पुरेशा प्रमाणात नेत्रदान होत नाही. कोणत्याही वयोगटातील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नेत्रदान केले जाऊ शकते. समाजाने आणखी पुढाकार घेतल्यास मोठ्या संख्येने अंध बांधवांना नवीन दृष्टी मिळू शकेल. - स्वप्निल गावंडे, सचिव, आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया.