राज्यात प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बावनकुळे मेहनती आहे. प्रदेशाध्यक्षपद हे मोठे पद आहे आणि हे पद मिळाल्यानंतर काय होते हे माहित आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होतील पण, कदाचित फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळेंना संधी असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी गडकरी यांनी केले.

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोही पळवून आणली – नितीन गडकरींची तुफान शाब्दिक फटकेबाजी!

काही कार्यकर्ते मेहनत करून पुढे येतात तर काही मागच्या दारातून येतात. मात्र, बावनकुळे यांनी खूप मेहनत घेत परिश्रम केले. पक्ष वाढविण्यासाठी ते महाराष्ट्रात फिरले. ऊर्जा खात्यात त्यांनी मोठे काम केले आहे. विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नव्हते ते त्यांनी मिळवून दिले. बावनकुळे यांच्याकडे एवढे कर्तृत्व आहे की ते केव्हा माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील हे सांगता येत नाही. म्हणजे कुठले काम कसे करायचे आणि निधी कसा मिळवायचा हे त्यांना कळत असल्यामुळे त्यांनी शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी आणला. पक्षाला यश मिळविण्यासाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा नाराज न होता पक्षाने त्यांना जे काम दिले ते त्यांनी प्रामाणिकपणे केले. त्यांच्या जागेवर ज्याला उमेदवारी दिली त्याला निवडून आणले. बावनकुळे कार्यकर्त्यांमध्ये नेहमी लोकप्रिय राहिले, असेही गडकरी म्हणाले.