उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम नगरागमनानिमित्त मंगळवारी नागपूर शहरात ठिकठिकाणी भाजपचे नेते व फडणवीस समर्थकांनी स्वागत कमानी व अभिनंदन फलक लावले. पण काही फलकांवर केंद्रीय गृहमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांची त्यांच्यावरील नाराजी कायम असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचे मंगळवारी नागपुरात आगमन झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे दणदणीत स्वागत केले. यानिमित्त ठिकठिकाणी अभिनंदन फलक लावण्यात आले होते. यापैकी काही कट्टर फडणवीस समर्थकांचे होते. काही फलकांवर अमित शहांसह इतर केंद्रीय नेत्यांचे छायाचित्र होते. मात्र काही फलकांवर फक्त शहांचेच छायाचित्र नव्हते.

फडणवीस समर्थक व माजी महापौर संदीप जोशी यांनी मिरवणुकीच्या मार्गावर अभिनंदनाचे अनेक फलक लावले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांची छायाचित्रे आहेत. पण अमित शहा यांचे छायाचित्र नाही. यासंदर्भात संदीप जोशी म्हणाले, अमित शहा पक्ष संघटनेत कुठल्याही पदावर नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे पक्षाची प्रमुख जबाबदारी आहे. त्यांचे छायाचित्र फलकावर आहे.