अमरावती : अमरावती  शहरानंतर आता परतवाडा येथील एका स्‍मॉल फायनान्‍स बँकेतही ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेथील बँकेत भरणा करण्यात आलेल्या ३२ हजार रुपयांपैकी ५०० रुपयांच्या ३५ नोटा बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी इसाफ स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक भाष्कर खरात (३०) रा. परतवाडा यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शेख दानिश शेख मेहमूद (२०) रा. अलकरीम कॉलनी, अचलपूर व राजा खान शेख महेमूद खान (३५) रा. बडा ताजबाग, नागपूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शेख दानिश व राजा खान यांनी ग्राहक सेवा केंद्रातून ऑनलॉइन ट्रान्जेक्शनद्वारे एजंसी मालकाच्या खात्यात अनुक्रमे ३५०० व २५ हजार असे एकूण २८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. संबंधित ग्राहक सेवा केंद्र व एजन्सीच्या मालकाने आरोपींनी जमा केलेली रक्कम व अन्य असे एकूण ३२ हजार रुपये इसाफ स्मॉल बँक, परतवाडा येथे जमा केले. त्यापैकी ५०० रुपयांच्या ३५ नोटा बनावट असल्याचे आढळून आले. ७ ते ८ सप्टेंबर २०२३ रोजी हा प्रकार घडला. तपासणीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बँक व्यवस्थापक भास्कर खरात यांनी तक्रार दाखल केली.

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा, प्रदेश सचिव निलंबित

अमरावती शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील कोटक महिंद्रा बँकेत ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्या होत्या. १४ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला होता. तर, बँक ऑफ बडोदाच्या सराफा बाजार शाखेत ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा आढळून आल्या होत्या. १६ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान वेगवेगळ्या तीन खातेदारांनी भरलेल्या रकमेत त्या २० बनावट नोटा आढळल्याची तक्रार खोलापुरी गेट ठाण्यात करण्यात आली होती.

या बनावट नोटांचा कागद आणि रंग हुबेहुब नोटांसारखा असल्‍याने ग्राहकांना ही नोट खरी की खोटी हे कळणे दुरापास्‍त झाले आहे. नोटांचे बंडल व्‍यावसायिकाला दिले, तर त्‍याला त्‍या बंडल मधील बनावट नोट नेमकी कोणती हे समजत नसल्‍याने अनेकांची फसगत होते.

एखाद्या व्‍यवहारातून आपल्‍याकडे जर एखादी संशयास्‍पद नोट आली, तर सर्वप्रथम बँकेत जाऊन मशीनद्वारे त्‍याची सत्‍यता पडताळून पहावी. नोट बनावट निघाल्‍यास स्‍थानिक पोलीस ठाण्‍यात जाऊन यासंदर्भात तक्रार करावी. रिझर्व बँकेच्‍या नियमानुसार, बँकेच्‍या निदर्शनास तुम्‍ही संबंधित नोट आणून दिल्‍यास, त्‍या बदल्‍यात त्‍याच मूल्‍याचे पैसे तुम्‍हाला दिले जात नाहीत. बनावट नोट व्‍यवहारात आणणे किंवा ती फिरवणे हा गुन्‍हा आहे.