नागपूर : सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुंबईतील मुलुंडमध्ये चक्क बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून अनेक बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली. त्यांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या खात्यातून पैसे उकळले. अशाप्रकारे संपूर्ण देशातून हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा नागपूर सायबर पोलिसांनी लावला. दोघांना पोलिसांनी अटक केली.

शुभम पितांबर शाहू (२६, जेएन रोड, मुलुंड, वेस्ट) आणि प्रद्मुम्न अनिल सिंह (३२, आझादनगर, मुंबई) ही सायबर गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपी शुभम हा चित्रपटांमध्ये ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणून काम करतो. तो आणि प्रद्युम्न हे टेलिग्रामवर सक्रिय असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आले. टोळीने त्यांना ‘टास्क फ्रॉड’मध्ये फसगत झालेल्या ग्राहकांची पुन्हा फसवणूक करण्यासाठी मुलुंडमध्ये बनावट सायबर पोलीस ठाण्याची उभारणी करण्यास सांगितले. तेथे शुभम हा पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळायचा. त्याला इंस्टाग्रामवर सक्रिय सायबर गुन्हेगार बँक खात्याचे क्रमांक द्यायचे व खाते गोठवायला सांगायचे. शुभम हा नागपूर सायबर पोलीस या नावाने बनावट ई-मेल बँकेला करून संबंधित ग्राहकाचे खाते गोठवण्यास सांगत होते. बँक व्यवस्थापकही पोलिसांचा मेल समजून संबंधित ग्राहकांचे खाते गोठवत होते. त्यानंतर शुभम हा आपण सायबर पोलीस ठाण्याचा निरीक्षक असल्याचे सांगून ग्राहकांना फोन करीत असे. तुमच्या खात्यात जमा पैसे हे दहशतवादी संघटनांचे किंवा गंभीर गुन्ह्यातील आहेत, अशी बतावणी तो करीत असे. यामुळे ग्राहक भयभीत होत असत. याचा फायदा घेत शुभम त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होता. त्यानंतर पुन्हा बँकेला ई-मेल करून खाते पूर्ववत करण्यास सांगत होता. अशाप्रकारे एकाच ग्राहकांची टास्क फ्रॉड आणि तोतया सायबर पोलिसांकडून दुहेरी फसवणूक होत होती.

हेही वाचा – “तुम्ही वैद्यकीय सुविधा देण्याऐवजी अडथळा निर्माण करत आहात,” न्यायालय असे कोणाला म्हणाले…

असा लागला छडा

नागपुरातील दत्तवाडीच्या आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक श्वेत कुमार यांना बनावट ईमेल आला. त्यांनी लगेच नागपूरचे सायबर ठाण्याचे अधिकारी अमित डोळस यांना माहिती दिली. त्यांनी सायबर पथकाकडून ई-मेल आयडीवरून तपास सुरू केला. त्यातून शुभम आणि प्रद्युम्न यांची नावे समोर आली. त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली. त्यांनी आतापर्यंत हजारो बँक खाती गोठवून कोट्यवधी रुपये उकळल्याची कबुली दिली. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

यूट्यूबवरून सायबर गुन्हेगारीचे धडे

शुभम शाहू हा मूळचा ओडिशाचा असून तो बारावी नापास तर त्याचा मित्र प्रद्युम्न हा दहावी नापास आहे. शुभम हा सूत्रधार असून त्याने यूट्यूबवरून सायबर गुन्हेगारीचे धडे घेतले. त्या माध्यमातून त्याची बड्या सायबर गुन्हेगारांशी ओळख झाली. देशभरात लुबाडणूक करणाऱ्या टोळीशी तो जुळला. यातून बारावी नापास शुभम काही महिन्यांतच कोट्यधीश बनला. त्याने आपले कुटुंब मुंबईत आणले व पैसे उडवायला लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – “मोदी, शहांनी दिल्लीत, तर फडणवीसांनी राज्यात घातक पायंडा पाडला,” संजय राऊत यांची टीका

टेलिग्रामवरून मिळायची बँक खात्याची माहिती

टेलिग्रामवर टास्क फ्रॉड करणारी टोळी कार्यरत आहे. ती देशभरातील लोकांना टास्क फ्रॉडमध्ये फसवते. त्यांचे लाखो रुपये उकळल्यानंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती शुभमला देत होती. त्यानंतर शुभम तोतया सायबर पोलीस बनून आणखी पैसे उकळत होता. त्यापैकी काही वाटा तो सायबर गुन्हेगारांच्या टोळीलाही देत होता, अशी माहिती पुढे आली आहे.